'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:48 IST2025-10-30T08:48:21+5:302025-10-30T08:48:46+5:30
Donald Trump, Xi Jinping meet: दक्षिण कोरियातील बुसान येथे ६ वर्षांनंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट. ट्रम्प म्हणाले, 'जिनपिंग अत्यंत कठोर वार्ताकार'. व्यापार करारावर लक्ष केंद्रित. संपूर्ण बातमी वाचा.

'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
बुसान : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल सहा वर्षांनंतर दक्षिण कोरियातील बुसान येथे महत्त्वपूर्ण भेट झाली. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या व्यापार कराराच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आजच या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.
बुसानमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे कौतुक केले, पण त्याचवेळी एक स्पष्ट प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे ही बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. "आमची भेट अत्यंत यशस्वी होणार आहे," असे ट्रम्प म्हणाले. मात्र, त्यांनी पुढे जोडले, "जिनपिंग खूपच कठोर वार्ताकार आहेत, ही काही चांगली गोष्ट नाही." या वक्तव्यानंतरही त्यांनी जिनपिंग यांना "एका महान देशाचे महान नेते" असे संबोधले आणि त्यांच्यासोबत नेहमीच चांगले संबंध राहिल्याचे नमूद केले.
यावर प्रतिक्रिया देताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही संयमी भूमिका घेतली. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटून खूप आनंद झाला," असे ते म्हणाले. तुमच्या पुन्हा निवडीनंतर, आम्ही तीन वेळा फोनवर बोललो आहोत, अनेक पत्रांची देवाणघेवाण केली आहे. दोन्ही देश जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असल्याने, त्यांच्या राष्ट्रीय परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी मतभेद असणे सामान्य आहे, पण दोन्ही देशांचे संबंध एकूणच स्थिर राहिले आहेत, असे जिनपिंग यांनी स्पष्ट केले.
आजच व्यापार करार...
ट्रम्प म्हणाले की, गुरुवारी दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या त्यांच्या बैठकीदरम्यान चीनसोबत व्यापार करार होऊ शकतो.
या दोन्ही नेत्यांनी औपचारिकपणे हात मिळवून आणि त्यानंतर आपापल्या प्रतिनिधीमंडळासोबत चर्चा करून जागतिक व्यापार आणि भू-राजकीय मुद्द्यांवर पुढील दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला.