वॉशिंग्टन : भारत आणि रशियाशी अमेरिकेचे असलेले संबंध आता दुरावले आहेत. या दोन देशांची चीनशी जवळीक झाली आहे. त्या तिघांना भविष्यात ही मैत्री लखलाभ होवो, असे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी काढले. चीनच्या तियांजिन शहरात झालेल्या एससीओ परिषदेमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील वाढत्या मैत्रीचे अमेरिकेसह जगाला दर्शन झाले. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. भारत, चीन आणि रशिया या तिन्ही देशांचे अमेरिकेशी विशेषतः युक्रेन युद्ध व जागतिक व्यापार धोरणाबाबत तीव्र मतभेद आहेत.
रशियावरील नाराजीपायी भारतावर घणाघाती टीकाडोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढविला. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो हे अमेरिकेला पसंत नाही. मात्र, त्याचवेळी रशियन कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करणाऱ्या चीनवर अमेरिकेने कोणतेही निर्बंध अद्याप लादलेले नाहीत.ट्रम्प प्रशासनातील व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, भारत हे रशियाच्या तेलाचे मोठे शुद्धीकरण केंद्र बनले आहे. त्यातून भारत मोठ्या प्रमाणावर नफा कमवत आहे. या व्यापारातून मिळणारा पैसा रशिया युक्रेनविरोधात हिंसाचार करण्यासाठी वापरत आहे.
पुतीन यांच्याशी लवकरच ट्रम्प करणार चर्चारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी मी विविध मुद्द्यांवर लवकरच पुन्हा चर्चा करणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी ट्रम्प यांनी गुरुवारी बोलणी केली होती. त्याबाबत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. रशियाने युक्रेनविरोधात सुरू ठेवलेले युद्ध लवकर संपुष्टात आणावे, अशी अमेरिकेसह पाश्चिमात्य देश वारंवार मागणी करत आहेत. भारताप्रमाणेच रशियावरही अनेक निर्बंध अमेरिकेने घातले आहेत. मात्र, पुतीन बधलेले नाहीत.
ट्रम्पच्या विधानावर प्रतिक्रियेस नकारअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास भारताने शुक्रवारी नकार दिला. तसेच व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी रशियन तेल खरेदीवरून भारतावर केलेली टीका अयोग्य व दिशाभूल करणारी आहे अशी प्रतिक्रिया भारताने दिली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की ट्रम्प यांच्या वक्तव्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही.