'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:09 IST2025-11-03T15:07:48+5:302025-11-03T15:09:03+5:30
Donald Trump: 'चीन आणि रशिया आपली आण्विक शस्त्रांची चाचणी करत आहे, त्यामुळे अमेरिकाही योग्य पाऊले उचलेल.'

'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनविषयी वादग्रस्त आणि स्पष्ट वक्तव्य करून आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवली आहे. ट्रम्प म्हणाले, 'जसा चीन अमेरिकेसाठी मोठा धोका आहे, अमेरिकादेखील चीनसाठी तितकाच धोका आहे. आम्ही त्यांच्याकडे पाहतो, ते आमच्याकडे पाहतात.' ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही महासत्तांमधील राजनैतिक आणि सामरिक संबंधांवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संघर्ष नव्हे, सहकार्य आवश्यक
अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दोन्ही देशांना टक्कर देण्याऐवजी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'दोन्ही देश जर परस्पर सहकार्य करतील, तर जगासाठी उत्तम परिणाम साधता येतील. स्पर्धा सुरू राहिली तरी ती युद्ध किंवा शत्रुत्वात बदलू नये.'
चीनच्या आण्विक शस्त्रांबाबत ट्रम्प चिंतित
ट्रम्प यांनी चीनकडून झपाट्याने वाढत असलेल्या आण्विक शस्त्रांच्या विकासाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'आमच्याकडे जगातील सर्वाधिक आण्विक शस्त्रे आहेत. रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ते अत्यंत वेगाने प्रगती करत आहेत. आमच्याकडे इतकी आण्विक शस्त्रे आहेत की, आम्ही ही पृथ्वी 150 वेळा नष्ट करू शकतो. रशियाकडेही मोठ्या प्रमाणात शस्त्रे आहेत, चीन लवकरच त्या पातळीवर पोहोचेल.'
...तर जगाला मोठा संदेश जाईल
ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी या विषयावर थेट चर्चा केली आहे. ते म्हणाले, 'जर अमेरिका, रशिया आणि चीन यांनी एकत्र येऊन आण्विक शस्त्रांवर नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केली, तर हा जगासाठी अत्यंत सकारात्मक संदेश ठरेल. मला वाटते, सर्व देशांनी आता शस्त्रसंपत्ती कमी करण्यासाठी, आण्विक निरस्त्रीकरणासाठी केले पाहिजे.'
अमेरिकेची शस्त्रचाचणी सुरू
'चीन आणि रशिया आपली आण्विक शस्त्र चाचणी करत आहेत, फक्त तुम्हाला त्याची माहिती नाही. त्यामुळे अमेरिकेनेही आपल्या सुरक्षेसाठी चाचणी सुरू केली आहे, ' अशी माहिती त्यांनी दिली. अमेरिकेतील गुप्तचर संस्थांनी अलीकडेच चीनवर अमेरिकेच्या वीज आणि जलपुरवठा व्यवस्थेवर सायबर हल्ले करण्याचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दिलेले विधान महत्वाचे ठरते.