ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:57 IST2026-04-12T10:55:54+5:302026-04-12T10:57:31+5:30
Donald Trump: वॉशिंग्टनमधील संपूर्ण टीम प्रत्येक क्षणाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून होती.

ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
Donald Trump: इराणच्या अणुकार्यक्रमावरून पश्चिम आशियात भडकलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ यांच्यात इस्लामाबाद येथे उशीरा थेट चर्चेस सुरूवात झाली. १९७९मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमधील संवाद थांबला होता. आता ४७ वर्षानंतर प्रथमच अमेरिका आणि इराण समोरासमोर बसून चर्चा करत असल्याचे दृश्य साऱ्या जगाने पाहिले. २१ तास प्रदीर्घ चर्चा होऊनही त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. यामुळे व्हान्स अमेरिकेत परत निघून गेले. यातच अमेरिकेत बसलेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानात इराणशी सुरू असलेल्या बैठकीकडे बारीक लक्ष होते. अनेकदा त्यांनी हॉटलाइनवरून व्हान्स यांच्याशी फोनाफोनी केल्याचे म्हटले जात आहे.
इस्लामाबादमध्ये गेल्या २१ तासांपासून सुरू असलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील मॅरेथॉन बैठक संपली. या प्रदीर्घ चर्चेनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स कोणत्याही कराराशिवाय अमेरिकेला रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी व्हान्स यांनी सांगितले की, संपूर्ण चर्चेदरम्यान ते एका हॉटलाइनद्वारे थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कात होते. या २१ तासांत त्यांनी ट्रम्प यांच्याशी अनेक वेळा संवाद साधला. वॉशिंग्टनमधील त्यांची संपूर्ण टीम प्रत्येक क्षणाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून होती.
अमेरिकेला ही चर्चा खरोखरच निष्कर्षापर्यंत पोहोचवायची होती
जे.डी. व्हान्स यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, केवळ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशीच नव्हे, तर परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि ॲडमिरल ब्रॅड कूपर यांच्याशीही सतत संपर्कात होते. ते आपल्या संपूर्ण टीमसोबत प्रत्येक तपशील शेअर करत होते. कारण अमेरिकेला ही चर्चा खरोखरच निष्कर्षापर्यंत पोहोचवायची होती. इतक्या विस्तृत विचारविनिमयानंतरही गोष्टी जुळून आल्या नाहीत. त्यामुळे व्हान्स परत अमेरिकेत निघून गेले.
दरम्यान, अडकलेले अब्जावधी रुपये परत मिळेपर्यंत माघार घेणार नाही, या भूमिकेवर इराण ठाम आहे. ट्रम्प प्रशासनाने होर्मुझची सामुद्रधुनी हा एक आंतरराष्ट्रीय मार्ग असून तो खुला ठेवण्यासाठी अमेरिका कोणत्याही थराला जाईल, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.