डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:26 IST2025-09-25T13:25:56+5:302025-09-25T13:26:48+5:30
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या एका विधानामुळे आता अमेरिकेतच त्यांची अडचण झाली आहे. ट्रम्प यांनी नुकतेच भाषण देताना, आपण नोबेल शांतता पुरस्काराचा दावेदार असल्याचा दावा केला. "मी आतापर्यंत ७ युद्धे थांबवली आहेत, त्यामुळे मला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळायला हवा", असे ते म्हणाले. मात्र, ट्रम्प यांच्या या दाव्यावर अमेरिकेतील जनतेला विश्वास नाही. वॉशिंग्टन पोस्ट आणि इप्सोसने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील बहुतांश नागरिकांना ट्रम्प हे या पुरस्कारासाठी पात्र नाहीत असे वाटते. विशेष म्हणजे, त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातील अर्ध्याहून अधिक लोक त्यांच्या या दाव्याशी सहमत नाहीत.
सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत झालेल्या या सर्वेक्षणातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या फक्त २२% अमेरिकन नागरिकांना असे वाटते की ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा.
ट्रम्प यांना सर्वात मोठा झटका त्यांच्याच पक्षाकडून बसला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या रिपब्लिकन लोकांपैकी ४९% लोकांनीच ट्रम्प यांना पुरस्कार देण्याचे समर्थन केले, तर ५१% लोकांनी ते या पुरस्कारासाठी पात्र नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
या सर्वेक्षणात बहुतांश अमेरिकनांनी २००९ मध्ये बराक ओबामा यांना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्काराबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ओबामा हे देखील तेव्हा या पुरस्कारासाठी पात्र नव्हते असे त्यांचे मत आहे.
व्हाईट हाऊसचा बचाव
या सर्वेक्षणावर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या एना केली यांनी मात्र ट्रम्प यांची जोरदार बाजू घेतली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे सर्वेक्षण म्हणजे त्यांनी जगभरातील दशकांपासून सुरू असलेले संघर्ष संपवून हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत." त्या पुढे म्हणाल्या, "जगभरातील कोणत्याही नेत्याने जागतिक स्थिरता वाढवण्यासाठी इतके काम केले नाही, जितके राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले आहे. ते शांतता पुरस्काराचे अनेक पटींनी अधिक हक्कदार आहेत, कारण त्यांना लोकांच्या मृत्यूची नव्हे, तर त्यांचे प्राण वाचवण्याची चिंता आहे."
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची अट
दरम्यान, संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांच्यावर एक वेगळीच अट ठेवली आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार हवा आहे. पण, त्यांना जर तो हवा असेल तर त्यांनी गाझा पट्टीतील इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष थांबवून दाखवावा. तेव्हाच त्यांना हा पुरस्कार मिळणे शक्य आहे."