"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:25 IST2026-04-07T09:17:02+5:302026-04-07T09:25:18+5:30
एका बातमीने अमेरिकेच्या बेपत्ता सैनिकाचा जीव धोक्यात घातला गेल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
Donald Trump: इराणच्या भूमीवर कोसळलेल्या अमेरिकन एफ-१५ फायटर जेटमधील दुसऱ्या वैमानिकाला वाचवण्यासाठी अमेरिकेने तब्बल १५५ विमानांचा ताफा मैदानात उतरवला होता. अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या या मोहिमेत अमेरिकेतीलच एका खबऱ्याने माहिती लीक केल्यामुळे हा वैमानिक इराणच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचला, असा खळबळजनक दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
'त्याला' वाचवण्यासाठी १५५ विमानांची फौज
२८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे पहिले फायटर जेट इराणमध्ये कोसळले. त्यातील एका वैमानिकाला तात्काळ वाचवण्यात आले, पण दुसरा अधिकारी बेपत्ता होता. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी अमेरिकेने ४ बॉम्बर, ६४ फायटर जेट्स, ४८ रिफ्युलिंग टँकर्स आणि १३ बचाव विमानांसह एकूण १५५ विमानांचा वापर केला. इराणची दिशाभूल करण्यासाठी अमेरिकेने अनेक ठिकाणी हालचाली केल्या, जेणेकरून इराणला वैमानिकाचे नक्की लोकेशन कळू नये.
मीडियातील 'त्या' बातमीने जीव टांगणीला
माध्यमांनी याबाबत दिलेल्या बातमीमुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. "जोपर्यंत अमेरिकेतील एका माध्यम संस्थेने दुसरा वैमानिक अजूनही बेपत्ता आहे अशी बातमी दिली नव्हती, तोपर्यंत इराणला याची कल्पनाच नव्हती. ही माहिती लीक होताच इराणने त्या वैमानिकाला पकडण्यासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा केली. त्या खबऱ्यामुळे ही मोहीम अधिक कठीण झाली. आम्ही त्या गद्दाराला शोधत आहोत. देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या त्या पत्रकाराला त्याचे सोर्स सांगावे लागतील, अन्यथा त्याला जेलमध्ये जावे लागेल," असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
जखमी अवस्थेत डोंगरावर चढाई
हा बेपत्ता सैनिक गंभीर जखमी झाला होता आणि त्याला प्रचंड रक्तस्त्राव होत होता. तरीही त्याने डोंगर चढून अमेरिकन दलाशी संपर्क साधला. त्याला वाचवण्यासाठी नेव्ही सील टीम ६ चे कमांडो इराणमध्ये खोलवर शिरले होते. इराणचे सैन्य जवळ येऊ नये म्हणून अमेरिकन विमानांनी इराणच्या ताफ्यांवर बॉम्बफेकही केली. अखेर या दोन्ही सैनिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून ते सध्या उपचार घेत आहेत.