‘पनामा’वर पुन्हा नियंत्रण ठेवण्याची ट्रम्प यांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 07:51 IST2024-12-24T07:51:37+5:302024-12-24T07:51:47+5:30
पनामा हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा सहयोगी आहे आणि हा कालवा त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे.

‘पनामा’वर पुन्हा नियंत्रण ठेवण्याची ट्रम्प यांची धमकी
फिनिक्स : अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पनामा कालव्यातून जाण्यासाठी जहाजांना ‘अनावश्यक’ शुल्क आकारले जात असल्याने त्यावर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांना सांगितले की, त्यांचे प्रशासन पनामा कालव्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकते, जे अमेरिकेने ‘मूर्खपणे’ आपल्या मध्य अमेरिकन मित्र देशाला दिले आहे.
पनामा कालवा जलाशयांवर अवलंबून आहे. तो २०२३ मध्ये दुष्काळामुळे प्रभावित झाला होता, ज्यामुळे देशाला त्यातून जाणाऱ्या जहाजांची संख्या मर्यादित करण्यास भाग पाडले गेले. याशिवाय बोटींकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ करण्यात आली. या वर्षाच्या उत्तरार्धात हवामान मध्यम असल्याने कालव्यावरील वाहतूक सामान्य झाली आहे, परंतु शुल्कातील वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे.
पनामा हा अमेरिकेचा एक महत्त्वाचा सहयोगी आहे आणि हा कालवा त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. पनामाच्या राष्ट्राध्यक्षांनी अनेक मुद्द्यांवर ट्रम्प यांना वेळोवेळी पाठिंबा दिला आहे.
आरोप नाकारले
पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राऊल मुलिनो यांनी ट्रम्प यांचे आरोप नाकारले आहेत. हा आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचे मुलिनो यांनी म्हटले आहे.