एच-वन बी व्हिसाशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 09:13 IST2025-10-18T09:13:27+5:302025-10-18T09:13:56+5:30
ट्रम्प प्रशासनाचा निर्णय दिशाहीन असून तो बेकायदाही आहे, असा त्यांचा दावा आहे. या खटल्यात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ व ‘डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ यांसह त्यांच्या सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे.

एच-वन बी व्हिसाशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नव्या एच-१बी व्हिसा फीचे शुल्क एक लाख डॉलर (सुमारे ८८ लाख रुपये) इतके वाढविल्याच्या निर्णयावर यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने कोलंबिया येथील न्यायालयात सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. ट्रम्प प्रशासनाचा निर्णय दिशाहीन असून तो बेकायदाही आहे, असा त्यांचा दावा आहे. या खटल्यात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ व ‘डिपार्टमेंट ऑफ स्टेट’ यांसह त्यांच्या सचिवांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे.
चीनचे नवीन ‘के-व्हिसा’ पाऊल
चीनने ‘के-व्हिसा’ नावाचा एक नवीन वर्क परमीट जाहीर केला आहे. या अंतर्गत, जागतिक स्तरावरील पात्र व्यावसायिक चीनमध्ये नोकरीच्या संधी शोधू शकतात.
सुमारे ८५ हजार कुशल कर्मचाऱ्यांची वानवा होईल
चेंबर ऑफ कॉमर्सचा आरोप आहे की, या निर्णयामुळे अमेरिकेतील नवोपक्रम व जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता धोक्यात आली आहे. एच-१ बी व्हिसाचे धोरण अमेरिकेच्या संसदेने (काँग्रेस) केले आहे. त्याचा उद्देशच अमेरिकेतील व्यवसायांच्या वृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय कौशल्याची मदत घेणे.
अशा परिस्थितीत एक लाख डॉलरइतके शुल्क वाढवून स्टार्ट अप आणि लघु-मध्यम व्यवसायांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती आहे. या धोरणामुळे ८५ हजार कुशल कर्मचाऱ्यांची वानवा होईल आणि अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांना त्याचा फायदा होईल. जगभरातून येणारा कौशल्यप्रधान वर्ग दुसऱ्या देशात जाऊ शकतो व एकप्रकारे आपण केलेल्या कायद्याचेही ते उल्लंघन ठरेल.