भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठे दावे करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. "भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व वाढत आहे, म्हणून आम्ही समस्या सोडवण्यास मदत केली आहे. मी असं म्हणत नाही की, मी मध्यस्थी केली. मी समस्या सोडवण्यास मदत केली" असं ट्रम्प यांनी आता सांगितलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प ट्रेडबाबतच्या त्यांच्या विधानावर मात्र ठाम राहिले. मी व्यापाराबद्दल बोललो तेव्हाच प्रकरण मिटलं असं म्हणाले. "गेल्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती खूप धोकादायक होत चालली होती. दोन्ही देशांनी अचानक क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली आणि आम्ही सर्व काही सेटल केलं."
"भारत आणि पाकिस्तान वर्षानुवर्षे भांडत आहेत. मला वाटलं होतं की मी काहीतरी मार्ग काढू शकतो आणि मी तसं केलं. तुम्ही किती काळ भांडत राहू शकता? मला खात्री नव्हती की, दोघेही काहीतरी तडजोड करतील. हे खूप कठीण होतं. खरोखरच नियंत्रणाबाहेर जाणार होतं" असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
१० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा याचं श्रेय स्वतःला घेतलं. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. "भारत आणि पाकिस्तानने तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे. दोन्ही देशांनी बुद्धिमत्ता दाखवली आहे" असं पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारत सरकारने फेटाळून लावला. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान अमेरिकेसोबतच्या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता, असंही भारत सरकारने स्पष्ट केलं.