NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:06 IST2026-04-09T08:06:33+5:302026-04-09T08:06:33+5:30
Donald Trump: गरज असताना मदत न केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाटो देशांना फटकारले.

NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Donald Trump: ३९ दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेने इराणसोबत दोन आठवड्यांचा युद्धविराम केल्याची घोषणा झाल्यानंतर जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले सुरूच ठेवल्याच्या रागात इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे जाहीर केले. आता हा मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेला इस्रायलच्या माध्यमातून सुरू असलेले युद्ध किंवा युद्धविराम यांपैकी एकाची निवड करावी लागेल, असा थेट इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे. यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना चांगलेच सुनावले आहे. गरज होती, तेव्हा मदत केली नाही, याची खंत डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवली. तसेच सूचक इशाराही दिला.
इराण युद्धात 'नाटो' संघटनेतील सहकारी देश आणि द. कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या अन्य दोस्त राष्ट्रांनी मदत न केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. त्यांनी 'नाटो'ला 'कागदी वाघ' असेही संबोधले. 'नाटो'ने त्यांच्या एकूण कारभारावरून माझ्या मनावर ओरखडा उमटवला असून, तो मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, अशी नाराजी ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.
नाटो प्रवक्त्यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
नाटोचे प्रवक्ते मार्क रुटे यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. अधिक मजबूत आणि अधिक न्याय्य बहुपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी मित्र राष्ट्रांनी प्रयत्न सुरू ठेवण्यावर रुटे यांनी भर दिला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. जेव्हा आम्हाला त्यांची गरज होती तेव्हा नाटो आमच्यासोबत नव्हते, आणि भविष्यात गरज पडल्यास ते आमच्यासोबत नसतील. ग्रीनलँड आठवा, तो गोंधळलेला बर्फाचा मोठा तुकडा, असे सांगत सूचक शब्दांत इशाराही दिला.
दरम्यान, युद्धविरामानंतरही मध्य इराणमधील इस्फाहान शहरात मोठे स्फोट झाले. यामुळे इराणमधील एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. युद्धविरामानंतर बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, यूएई येथे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले झाले. कुवेतमध्ये २८ ड्रोन हल्ल्यांमुळे वीज व जलप्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आखाती देश अजून अलर्ट मोडवर आहेत.
“NATO WASN’T THERE WHEN WE NEEDED THEM, AND THEY WON’T BE THERE IF WE NEED THEM AGAIN. REMEMBER GREENLAND, THAT BIG, POORLY RUN, PIECE OF ICE!!!” - President Donald J. Trump pic.twitter.com/xgEV8P1n4n
— The White House (@WhiteHouse) April 8, 2026