ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:00 IST2025-11-05T11:59:54+5:302025-11-05T12:00:41+5:30
Zohran Mamdani vs Donald Trump: ममदानी हे युगांडा-जन्मलेले, भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. त्यांची आई मीरा नायर या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
न्यूयॉर्क : भारतीय-आफ्रिकी वंशाचे झोहरान ममदानी यांची न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर म्हणून निवड झाली असून, त्यांनी एक मोठा इतिहास रचला आहे. ३४ वर्षीय ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम, पहिले भारतीय आणि १०० वर्षांहून अधिक काळातील सर्वात तरुण महापौर बनले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना प्रचंड विरोध केला होता, तरीही त्यांच्या नाकावर टिच्चून ममदानी जिंकले आहेत. यानंतर लगेचच ममदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना तुम्हाला न्यूयॉर्कच हरविणार असल्याचा इशारा दिला आहे.
ममदानी हे युगांडा-जन्मलेले, भारतीय-अमेरिकन चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आहेत. त्यांची आई मीरा नायर या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला. ममदानी यांनी परवडणारी घरे, मोफत चाइल्ड केअर, मोफत बस सेवा आणि पोलीस सुधारणा अशा अत्यंत प्रगतीशील अजेंड्यावर निवडणूक लढवली.
डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देताना ममदानी यांनी 'ट्रम्प, मला माहिती आहे तुम्ही हे पाहत असणार. माझ्याकडे तुमच्यासाठी चार शब्द आहेत. टीव्हीचा आवाज थोडा मोठा करा. ज्या न्यू -यॉर्क शहराने ट्रम्पना जन्माला घातले, तेच आता देशाला दाखवेल की त्यांना कसे हरविले जाते', असे म्हटले.
याचबरोबर प्रतिस्पर्धी अँड्र्यू कुओमो यांचा उल्लेख करत ते म्हणाले, आम्ही एका राजकीय घराण्याचा पराभव केला आहे. मी त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात शुभेच्छा देतो, पण आज मी शेवटच्या वेळी त्यांचे नाव घेत आहे. तसेच ममदानी यांनी घरमालक आणि अब्जाधीशांना गंभीर इशारा दिला आहे. 'भाडेकरूंचे शोषण करणाऱ्या घरमालकांना आम्ही जबाबदार धरणार आहेत. कारण आमच्या शहरात ट्रम्पसारखे लोक त्यांच्या भाडेकरूंचा गैरफायदा घेण्याची सवय लावून बसले आहेत. अब्जाधीशांना कर चुकवण्यास आणि सवलतींचा गैरफायदा घेण्यास परवानगी देणारी भ्रष्ट व्यवस्था आम्ही उध्वस्त करणार आहोत', असेही ममदानी म्हणाले.