Donald Trump: या वर्षाच्या अखेरीस भारतात क्वाड शिखर परिषदेचे आयोजन होत आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या परिषदेत सहभागी होणार नाहीत, असा दावा द न्यू यॉर्क टाईम्सने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संबंध कसे बिघडले, याची सविस्तर माहितीही त्यात देण्यात आली आहे.
'नोबेल पुरस्कार आणि तणावपूर्ण फोन कॉल: ट्रम्प-मोदी संबंध कसे बिघडले' या शीर्षकाच्या अहवालात न्यू यॉर्क टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेत डोनाल्ड ट्रम्प येणार नाहीत. मात्र, न्यू यॉर्क टाइम्सच्या दाव्यावर अमेरिका किंवा भारताकडून कोणतीही अधिकृत टिप्पणी आलेली नाही.
मोदी-ट्रम्प संबध बिघडलेडोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष मिटवल्याचा दावा केला, मात्र भारताने प्रत्येकवेली हा दावा फेटाळून लावला. यानंतर ट्रम्प आणि मोदी यांच्यातील संबंध बिघडू लागले. यामुळेच ट्रम्प भारतावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार, १७ जून रोजी जी७ शिखर परिषदेतून परतताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी ३५ मिनिटे फोनवर चर्चा केली. यादरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, लष्करी तणाव संपवण्याचे श्रेय त्यांना जाते. तसेच, पाकिस्तान त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अहवालात असेही म्हटले आहे की, याचा अप्रत्यक्ष अर्थ असा होता की, मोदींनीही ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी पाठिंबा द्यावा. मात्र, भारताने वारंवार म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही. तसेच, मोदींनी नोबेल पुरस्काराच्या मुद्द्यावरही बोलण्यास नकार दिल्याने दोन्ही नेत्यांमधील संबंधांमध्ये दरी वाढली.
टॅरिफवरून तीव्र संघर्ष सुरू या अहवालात असेही नमूद केले आहे की, ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादले आहे. तज्ञांच्या मते, हे पाऊल केवळ रशियामुळे नाही, तर भारतावर दबाव टाकण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे दिसून येते. टॅरिफ चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी अनेक वेळा मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु पंतप्रधानांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही.