राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली; 'या' नेत्याला मिळणार संधी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:59 IST2025-08-06T18:57:47+5:302025-08-06T18:59:07+5:30
Donald Trump: अमेरिकेत एका व्यक्तीला दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होता येते, त्यामुळे ट्रम्प यांची ही शेवटची टर्म असेल.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली; 'या' नेत्याला मिळणार संधी...
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल मोठी घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स हे त्यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' चळवळीचे उत्तराधिकारी असतील, असे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या कामाचेही कौतुक केले आहे.
मीडियाने उत्तराधिकाऱ्याबद्दल विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, माझ्या उत्तराधिकाऱ्याबद्दल आताच बोलणे खूप घाईचे ठरेल. पण, जेडी व्हेन्स खूप चांगले काम करत आहेत. कदाचित हेच माझे उत्तराधिकारी असतील. परराष्ट्र सचिव मार्को रुबियोदेखील काही प्रमाणात त्यांच्यासोबत सामील होऊ शकतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत या दोन नेत्यांपैकी एकाला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची संधी दिली जाऊ शकते.
४० वर्षीय जेडी व्हेन्स यांनी यूएस मरीन कॉर्प्समध्ये सेवा बजावली आहे. २०२३ ते २०२५ पर्यंत त्यांनी ओहायो सिनेटर म्हणूनही काम केले. रुबियो आणि व्हेन्स यांच्यात उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. रुबियो यांनी गेल्या महिन्यात फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत २०२८ मध्ये राष्ट्राध्यक्ष होण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेबद्दल बोलताना म्हटले होते की, 'भविष्यात काय होईल हे आताच सांगता येत नाही.' यावरुन ते यासाठी इच्छूक असल्याचे दिसून येते.