'या' देशातील लोकांना अमेरिकेत घुसू देणार नाही..; गोळीबाराच्या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:53 IST2025-11-28T11:52:26+5:302025-11-28T11:53:17+5:30
Donald Trump: बुधवारी व्हाइट हाऊस जवळ झालेल्या गोळीबारात एका जवानाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे.

'या' देशातील लोकांना अमेरिकेत घुसू देणार नाही..; गोळीबाराच्या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेणार
Donald Trump: अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे सरकारी निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेने डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. या घटनेनंतर त्यांनी पुन्हा एकदा स्थलांतरीतांबाबत कठोर भूमिका मांडली आहे. या गोळीबारात जखमी दोन नॅशनल गार्ड जवानांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प प्रशासन थर्ड वर्ल्ड देशांमधून येणारे सर्व स्थलांतर कायमचे थांबवण्याच्या दिशेने काम करत आहे, असे त्यांनी घोषित केले आहे.
घटनेनंतर स्थलांतर धोरणावर कठोर भूमिका
बुधवारी अफगाण नागरिकाने केलेल्या कथित हल्ल्यात दोन जवान जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकन प्रशासनाने अफगाणिस्तानासह 19 देशांतील स्थलांतरितांना दिलेल्या कायमस्वरुपी निवासाच्या (ग्रीन कार्ड) पुनरावलोकनाची घोषणा केली होती.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत म्हटले की, "अमेरिकी प्रणाली पूर्णपणे पुनर्प्राप्त आणि रीसेट होण्यासाठी मी सर्व थर्ड वर्ल्ड देशांमधील स्थलांतर कायमचे थांबवणार आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, बायडेन प्रशासनाच्या काळात लाखो अवैध प्रवेश झाल्यामुळे देशाच्या सुरक्षेवर परिणाम झाला आहे. अमेरिकेसाठी उपयोगी नसणारे किंवा देशाबद्दल प्रेम नसणारे लोक बाहेर काढले जातील."
"गैर-नागरिकांना मिळणारे सर्व फेडरल लाभ आणि सबसिडी रद्द केली जाईल. देशांतर्गत शांततेसाठी धोका ठरणाऱ्यांची नागरिकता रद्द केली जाईल. सुरक्षेस धोका निर्माण करणारे किंवा ‘पाश्चिमात्य सभ्यतेशी विसंगत’ असणारे विदेशी नागरिक देशाबाहेर पाठवले जातील. या सर्व उपायांचा उद्देश अवैध आणि अशांतता निर्माण करणारी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी करणे हा आहे," असे त्यांनी म्हटले.