ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:42 IST2025-10-21T13:41:23+5:302025-10-21T13:42:43+5:30
donald trump mark sawaya special envoy to iraq: डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या संबंधीचे घोषणा केली

ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
donald trump mark sawaya special envoy to iraq: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून अनेकवेळा असे निर्णय घेत आहेत, ज्यामुळे वाद निर्माण होताना दिसत आहे. आता ट्रम्प यांनी गांजा विक्रीचे आरोप असलेल्या आणि अंमली पदार्थांच्या प्रचारात सहभागी असलेल्या एका व्यावसायिकाची इराकमधील विशेष दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, अध्यक्ष ट्रम्प यांनी मिशिगनमधील एक प्रसिद्ध व्यापारी मार्क सवाया यांची इराकमधील विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
सवाया हे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध आहेत. ट्रम्प यांनी सवाया यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे. त्यांना एक हुशात व्यक्ती म्हणून वर्णन करताना ट्रम्प यांनी लिहिले आहे की, "सवाया इराकसाठी विशेष दूत म्हणून काम करतील हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. अमेरिकेच्या संबंधांबद्दल आणि या प्रदेशातील त्यांच्या संपर्कांबद्दल मार्क यांची सखोल समज अमेरिकन लोकांच्या हितांना पुढे नेण्यास मदत करेल."
सवाया यांच्यावर गांजा विक्रीचा आरोप
'द इंडिपेंडेंट'ने सवाया बद्दल एक वृत्त दिले होते. अहवालात असे म्हटले आहे की, सवाया मिशिगनमध्ये गांजा विक्री दुकानांची एक साखळी चालवतात आणि इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे या विक्रीचा मोठ्या प्रमाणात प्रचार करतात. अहवालात असेही म्हटले आहे की, सवाया स्वतः डेट्रॉईटच्या पश्चिमेकडील हेझेल पार्क आणि लिओनोइसमध्ये 'लीफ अँड बड' नावाच्या गांजा रिटेल विक्रीच्या साखळी दुकानांचे मालक आहेत. २०१८ पासून मिशिगनमध्ये गांजा विक्री कायदेशीर आहे, त्यामुळे तो ते उघडपणे विक्री करतात.
इराक-अमेरिका संबंध सुधारण्याचा प्रयत्न
सवाया यांना सरकारमध्ये काम करण्याचा कोणताही अनुभव नाही, त्यामुळे त्यांना इतके उच्चपदस्थ पद कसे देण्यात आले याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. २००३ मध्ये सद्दाम हुसेनच्या हत्येपासून अमेरिकेने इराकी राजकारणावर वर्चस्व गाजवले आहे, परंतु अलीकडे दोघांमधील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेला शह देण्यासाठी इराकने अलीकडेच इराणशी करार केला आहे. अशा परिस्थीतीत सवाया यांची भूमिका काय असेल, याकडे सारे लक्ष आहे.