...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 07:56 IST2025-12-18T07:52:59+5:302025-12-18T07:56:02+5:30
जून महिन्यात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. जे कुठल्याही पाकिस्तानी सैन्य प्रमुखासाठी पहिलीच वेळ होती.

...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
इस्लामाबाद - पाकिस्तानी फिल्ड मार्शल असीम मुनीर पुढील आठवड्यात अमेरिकेचा दौरा करून तिथे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. मागील ६ महिन्यात मुनीर तिसऱ्यांदा ट्रम्प यांना भेटतील. ट्रम्प आणि मुनीर यांच्या या बैठकीचा फोकस गाझा स्टेबलाइजेशन फोर्सवर असेल, कारण अमेरिकेकडून गाझा येथे सैनिकी योगदान देण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला जात आहे, परंतु गाझा येथे सैन्य पाठवल्यास पाकिस्तानात उद्रेक भडकू शकतो असं काही विश्लेषकांना वाटते.
रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय की, मुस्लिम देशांमधून गाझामध्ये सैन्य पाठवण्याच्या ट्रम्प यांच्या २० कलमी योजनेवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानी फिल्ड मार्शल असीम मुनीर पुढच्या आठवड्यात ट्रम्प यांना भेटणार आहेत. गाझा येथे हमाससारख्या कट्टरपंथी समुहाला संपवणे आणि तिथे आर्थिक स्थिरता आणणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. परंतु अनेक मुस्लीम देशांना या मिशनवर शंका आहे, कारण या लढाईत ते अडकू शकतात. त्यातून त्यांच्या देशात पॅलेस्टिनी समर्थक आणि इस्रायलविरोधी जनतेत असंतोष वाढू शकतो. मात्र तरीही मुनीर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संबंध आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यातून अमेरिकेचा विश्वास पाकिस्तानला पुन्हा मिळवता येईल. जून महिन्यात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये मुनीर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. जे कुठल्याही पाकिस्तानी सैन्य प्रमुखासाठी पहिलीच वेळ होती.
दुसरीकडे वॉशिंग्टनस्थित अटलांटिक कौन्सिलमधील दक्षिण आशियाचे वरिष्ठ फेलो मायकेल कुगेलमन म्हणाले की, जर पाकिस्तानी लोकांनी या मोहिमेचा भाग होण्यास नकार दिला तर त्यातून ट्रम्प नाराज होऊ शकतात आणि ही पाकिस्तानसाठी समस्या बनू शकते, कारण ना केवळ असीम मुनीर तर तिथले नागरीक आणि लष्करी नेतृत्वाला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करावी आणि सुरक्षा मदत करावी अशी इच्छा आहे, जी बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत आहेत असं त्यांनी सांगितले. पाकिस्तान हा जगातील एकमेव मुस्लीम देश आहे ज्याकडे अण्वस्त्रे आहेत, त्यांनी भारतासोबत तीन युद्धे लढली आहेत आणि अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या इस्लामिक दहशतवाद्यांशी लढत आहे. ट्रम्प पाकिस्तानच्या संस्थात्मक क्षमतेकडे आकर्षित झाले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानच्या लष्करी ताकदीमुळे ट्रम्प यांची उत्सुकता वाढली आहे. ट्रम्प देखील या पाकिस्तानसोबत चर्चेवर खूश आहेत कारण ते पाकिस्तानची लष्करी क्षमता, संस्थात्मक क्षमता पाहतायेत आणि पाकिस्तान स्पर्धा करू शकते हे ट्रम्प यांना माहिती आहे असं लेखिका आणि संरक्षण विश्लेषक आयेशा सिद्दीका यांनी सांगितले. जेव्हा वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसच्या प्रतिक्रियेबाबत पाकिस्तानी लष्कर, परराष्ट्र मंत्रालय आणि माहिती मंत्रालयाला प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.