'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:43 IST2025-09-18T11:41:58+5:302025-09-18T11:43:01+5:30
Donald Trump Lula Da Silva: ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, जगाचे सम्राट नाहीत, असे खडेबोल सिल्वा यांनी ट्रम्प यांना सुनावले.

'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
Donald Trump Lula Da Silva Latest News: "माझे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणतेही नाते नाहीये. कारण जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते, तेव्हा मी राष्ट्रपती नव्हतो. त्यांचा संबंध बोल्सोनारोंसोबत आहेत. ब्राझील सोबत नाहीत. ट्रम्प भलेही अमेरिकेचे अध्यक्ष असतील पण, ते जगाचे सम्राट नाहीयेत", असे खडेबोल ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला.
लुला दा सिल्वा सातत्याने ट्रम्प यांच्या भूमिकेवर आणि धोरणांवर टीका करत आले आहेत. ट्रम्प यांनीही ब्राझीलवरही ५० टक्के टॅरिफ लादला आहे. दोन्ही देशात संवाद होऊन तणाव कमी होईल अशी शक्यता होती, पण लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांच्याशी बोलणार नसल्याचे स्पष्ट केले.
अमेरिकन लोकांना जास्त दराने खरेदी कराव्या लागतील
लुला दा सिल्वा म्हणाले, "अमेरिकेचे टॅरिफ पूर्णपणे राजकीय आहे. यामुळे अमेरिकेतील लोकांना ब्राझीलमधून निर्यात होणाऱ्या वस्तू महाग दराने खरेदी कराव्या लागणार आहेत. अध्यक्ष ट्रम्प हे ब्राझीलसोबतच्या संबंधांमध्ये ज्या चुका करत आहेत, त्याची किंमत अमेरिकन लोकांना मोजावी लागणार आहे."
ब्राझीलमधून अमेरिकेत कॉफी आणि मांसाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. टॅरिफचा याच्या थेट परिणाम झाला आहे.
मी कधीही ट्रम्प यांना कॉल केला नाही
डोनाल्ड ट्रम्प यांना कधी कॉल केला का, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला का? या प्रश्नावर बोलताना ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा म्हणाले की, "मी कधीही अशाप्रकारे फोन कॉल केले नाही. कारण त्यांनी कधीही चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी सभ्यपणे चर्चा केली नाही. त्यांनी थेट सोशल मीडियावरून टॅरिफ लागू करत असल्याची घोषणा केली."
"पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत जर ट्रम्प यांच्याशी भेटीचा प्रसंग आला, तर मी त्यांचं स्वागत करेन, कारण ते एक सभ्य व्यक्ती आहेत", असेही लुला दा सिल्वा म्हणाले.