russia slams donald trump us forcing the world to buy american oil kremlin vladimir putin tariff
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरून रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख करत, रशियन तेल आणि वायू खरेदीवरून भारत-चीनसह नाटोवरही निशाणा साधला. याच बरोबर, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रशियाला 'कागदी वाघ', म्हटले होते. यानंतर आता रशियाने ट्रम्प यांच्यावर पलटवार करत, त्यांना 'व्यापारी' म्हटले आहे. ट्रम्प हे एक व्यापारी आहे, ते जगाला अमेरिकेकडून तेल आणि वायू महागड्या किंमतीत खरेदी करण्यास भाग पाडत आहे, असे क्रेमलीनने म्हटले आहे. तसेच, ट्रम्प यांच्या 'कागदी वाघ' म्हणण्यावरूनही पलटवार केला आहे.
भारत-चीनसह नाटोवरही निशाणा -मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी भारत आणि चीनला जबाबदार धरले आहे. चीन आणि भारत हे रशियन तेल खरेदी करत असून या युद्धाचे मुख्य वित्तपुरवठादार आहेत. यावेळी ट्रम्प यांनी नाटो देशांवरही टीका केली. ते म्हणाले, 'नाटो देशांनीही रशियन ऊर्जा आणि त्याच्या उत्पादनांवर फार निर्बंध घातलेले नाहीत. ते स्वतःविरोधातच युद्धाला फंडिग करत आहेत. युरोपियन संघ रशियाशी लढत आहेत आणि त्याच्याकडूनच तेल–गॅस खरेदी करत आहेत, हे लज्जास्पद आहे."
यानंतर, मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) ट्रम्प यांनी सोशल ट्रुथवर पोस्ट करत म्हटले होते की, "साडे तीन वर्षांपासून रशिया कोणत्याही उद्देशाशिवाय यूक्रेनशी लढत आहे आणि हे रशियाला कागदी वाघासारखे बनवत आहे. यूक्रेन युरोपियन सहाय्याने आपला हरवलेला प्रदेश परत मिळवू शकतो आणि अमेरिका नाटोला शस्त्रे पुरवत राहील."
'रशिया कागदी वाघ नाही, तर अस्वल' -ट्रम्प यांच्या या वक्तव्यांवर पलटवार करताना क्रेमलिनने म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ट्रम्प यांच्या, युक्रेन वाद सोडवण्यासाठी मदत करण्याच्या इच्छेचे मोठे कौतुक करत असतात. ट्रम्प यांच्या 'कागदी वाघ' विधानावरून प्रत्युत्तर देतान क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, "रशिया कागदी वाघ नाही, तर अस्वल आहे आणि अस्वल कधी कागदी असत नाही." एढेच नाही तर, रशियन सैन्य यूक्रेनमध्ये वेगाने पुढे सरकत आहे, असेही रशियाने म्हटले आहे.