सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:29 IST2025-10-10T14:58:35+5:302025-10-10T16:29:33+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
Nobel Peace Prize: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना देण्यात आला आहे. व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांच्या संवर्धनासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे जाण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मारिया मचाडो यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प अनेक महिन्यांपासून नोबेल पुरस्काराचे दावेदार होते, पण नोबेल समितीने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली नाही.
जागतिक शांतता, मानवी हक्क आणि संघर्ष थांबवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो. या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत होते, पण ते या पुरस्कारापासून वंचित राहिले. युक्रेन युद्ध आणि इतर आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल ट्रम्प यांना नामांकित केले जाऊ शकते अशी चर्चा बऱ्याच काळापासून होती. मात्र अखेर, ज्युरीने या वर्षीचा पुरस्कार मारिया मचाडो यांना देण्याचा निर्णय घेतला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल असंख्य दावे आणि त्यांच्या समर्थक देशांकडून त्यांना मिळालेला उघडपणे पाठिंबा एवढं सगळं असूनही जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारासाठी ट्रम्प यांच्याऐवजी मारिया यांचे नाव निवडले गेले. मारिया यांचे नाव जाहीर करताना समितीने बक्षिसाचीही घोषणा केली. "हुकूमशाहीमुळे व्हेनेझुएलासारख्या देशात राजकीय काम करणे सोपे नव्हते. हुकूमशाही असूनही मारिया यांनी सातत्याने त्यांच्या देशात निष्पक्ष निवडणुकांची मागणी केली आहे. नोबेल शांतता पुरस्कारासोबत, मारिया यांना आता ११ दशलक्ष स्वीडिश क्रोना आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. हा पुरस्कार १० डिसेंबर रोजी ओस्लो येथे प्रदान केले जातील," असं समितीने म्हटलं.
मचाडो यांनी सुमाते ही संघटना स्थापन केली, जी लोकशाही सुधारण्यासाठी काम करते. व्हेनेझुएलाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणात व्यत्यय आणून माचाडो पहिल्यांदा चर्चेत आल्या. ही घटना १४ जानेवारी २०१२ रोजी घडली. चावेझ यांनी संसदेत ९ तास ४५ मिनिटे भाषण दिले होते तेव्हा माचाडो त्यांच्यावर ओरडल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मचाडो यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले होते. मारिया मचाडो यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मचाडो गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ देशात लपून राहत आहेत.