ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:07 IST2025-07-23T16:06:46+5:302025-07-23T16:07:28+5:30
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी म्हटले होते की, कोका-कोलाने त्यांच्या कोलामध्ये उसाची साखर वापरण्यास सहमती दर्शविली आहे...

ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी अखेर कामी आली आहे. त्यांनी कोका-कोला कंपनीला कोकमध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरपऐवजी उसाची साखर वापरण्यास सांगितले होते. कंपनीने यावर सहमती दर्शविली आहे. कोका-कोला उसाच्या साखरेपासून बनवलेला एक नवीन कोक लाँच करणार आहे.
तत्पूर्वी, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर दावा केला होता की त्यांनी कोका-कोलाला हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप बदलण्यास राजी केले आहे. दरम्यान आता कंपनीचे म्हणणे आहे की, ते लवकरच उसाच्या साखरेपासून बनवलेला कोक लाँच करणार आहेत. खरे तर, कंपनी आधीच अनेक देशांमध्ये उसाची साखर वापरते. मात्र, आता अमेरिकेत पहिल्यांदाच कोकमध्ये उसाची साखर वापरली जाणार आहे.
या नवीन कोकमुळे लोकांना अधिक पर्याय उपलब्ध होतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. लोक त्यांच्या आवडीनुसार ते निवडू शकतील. कंपनीचे सीईओ जेम्स क्विन्सी यांनी आशा व्यक्त केली आहे की, लोकांना हे पेय आवडेल. तसेच, कोका-कोला अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या इतर अनेक पेयांमध्येही उसाची साखर वापरते. यांत, लिंबूपाणी आणि कॉफीचा समावेश आहे. आमची वेगवेगळे स्वीटनर वापरण्याची इच्छा आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडीची चव मिळेल, असेही क्विन्सी यांनी म्हटले आहे.
रेसिपी बदलणार नाही -
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी म्हटले होते की, कोका-कोलाने त्यांच्या कोलामध्ये उसाची साखर वापरण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, कंपनीने म्हटले होते की, कोका-कोलाची मूळ रेसिपी बदलणार नाही. त्यात उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरपच वापरला जाईल. कंपनी उसाच्या साखरेपासून बनवलेला वेगळा कोक तयार करेल.
ट्रम्प प्रशासनाचे हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेस सेक्रेटरी
रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर हे उच्च-फ्रुक्टोज कॉर्नच्या विरोधात आहेत. अमेरिकेतील अन्नपदार्थांमधून कृत्रिम आणि प्रक्रिया केलेल्या गोष्टी काढून टाकायला हव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.