अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, आज होणार शपथविधी; म्हणाले, आता आमच्याकडे प्रचंड अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:03 IST2025-01-20T07:03:32+5:302025-01-20T07:03:49+5:30
Donald Trump News: अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत.

अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, आज होणार शपथविधी; म्हणाले, आता आमच्याकडे प्रचंड अनुभव
वॉशिंग्टन - अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते वॉशिंग्टनमधील अनेक कार्यक्रमात रविवारी व्यस्त होते.
ट्रम्प हे सत्तेत परतण्याचा आणि त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ चळवळीचा उत्सव साजरा करत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये परतण्याची त्यांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक ध्रुवीकरण करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. २०१७ मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पहिल्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये आले तेव्हा ते शहरातील बहुतेकांसाठी अनोळखी होते. आता आमच्याकडे अनुभव असल्याचे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे रविवारी आपल्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी दक्षिण कॅरोलिनामध्ये होते. (वृत्तसंस्था)
ट्रम्प कुटुंबाचे वैयक्तिक निमंत्रित म्हणून उपस्थित
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याला ट्रम्प कुटुंबाचे वैयक्तिक निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारताच्या भेटीसंदर्भात सल्लागारांशी चर्चा
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनसोबतचे संबंध सुधारण्यासाठी पदभार स्वीकारल्यानंतर चीनला भेट देण्याची शक्यता आहे.
याशिवाय त्यांनी भारताच्या संभाव्य भेटीबाबत सल्लागारांशीही चर्चा केली.