ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:23 IST2024-07-18T14:21:26+5:302024-07-18T14:23:40+5:30
Donald Trump Assassination Attempt Investigation Updates: ट्रम्प यांच्यावर १३ जुलैला एका २० वर्षीय तरुणाने रॅलीमध्ये हल्ला केला होता

ट्रम्पवरील हल्ल्याची तारीख हल्लेखोराने आधीच केली होती जाहीर, कोड-वर्डचा केला होता वापर
Donald Trump Assassination Attempt Investigation Updates: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांकडे अद्ययावत तंत्रज्ञान असूनही त्यांना अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला रोखता न आल्याने, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. रॅलीच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात लावलेल्या कॅमेरात हल्लेखोर स्पष्टपणे दिसतो आहे. पण तरीही अमेरिकन सुरक्षा यंत्रणांना त्याला रोखता आले नाही. आता या प्रकरणाच्या तपासात एक माहिती समोर आली आहे. ट्रम्पवर हल्ला करणार असल्याचे संकेत त्या हल्लेखोराने आधीच दिले होते असे सांगितले जात आहे. हल्लेखोराने एका गेमिंग वेबसाइटवर एका कोडच्या माध्यमातून हल्ल्याची तारीख जाहीर करून टाकली होती.
कशी मिळाली नवी माहिती?
हल्ल्याचा तपास करणाऱ्या एजन्सीने शूटरचा लॅपटॉप जप्त केला. तपासात समोर आले की हल्लेखोर मॅथ्यू क्रुक्सने एका गेमिंग वेबसाइटवर लिहिले होते, "माझा १३ जुलैला प्रीमियर आहे, तो कसे आहे ते नक्की पहा." १३ जुलै रोजीच २० वर्षीय हल्लेखोराने एका रॅलीला ट्रम्प संबोधित करत असताना गोळीबार केला होता. ही गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. सुदैवाने त्यांना मोठी हानी झाली नाही. पण हल्लेखोराला काही काळातच ताब्यात घेण्यात आले.
खूप दिवसांपासून सुरु होती तयारी
थॉमस मॅथ्यू क्रूक्स अनेक आठवडे ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करत होता. त्याच्या लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ट्रम्प यांच्या रॅलीच्या लोकेशनची आणि स्थानाची माहिती सापडली. हल्लेखोराने घरी बसून ट्रम्प यांच्या रॅलीच्या संपूर्ण ठिकाणाचा अभ्यास केला होता. त्याच्या हल्ल्याच्या पद्धतीवरून असे दिसते की ट्रम्प यांच्या रॅलीत तैनात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर त्याने बारीक लक्ष ठेवले होते.
दरम्यान, या हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही पण या घटनेने अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.