बीजिंग : सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडीओ किंवा रिल्स पाहणे हे तरुण आणि मध्यम वयाच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, झोपण्याच्या आधी रील्स पाहताना फारशी शारीरिक हालचाल होत नाही.
या गोष्टीचा तरुण व मध्यमवयीन लोकांना उच्च रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता आहे. या संदर्भात चीनमधील ४,३१८ तरुण आणि मध्यमवयीन लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्या माहितीच्या आधारे केलेल्या अभ्यासातील निष्कर्षांवर आधारित एक लेख बीएमसी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.
काय आहे अहवालात?रात्री झोपण्याच्या आधी ज्या व्यक्तींनी रील्स पाहण्याकरिता जास्त वेळ दिला, त्यांना उच्च रक्तदाबाचा विकार जडण्याची अधिक शक्यता दिसून आली. बंगळुरू येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी या निष्कर्षांची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यावर त्या विषयावर चर्चा सुरू झाली.
‘वाईट सवयी घालविल्या पाहिजेत’झोपी जाण्याआधी रील्स बघण्याची सवय लोकांनी घालविली पाहिजे. शॉर्ट व्हिडीओ बघण्याकरिता लोक बराच वेळ वाया घालवितात.शरीराला दररोज आठ तास शांत झोप आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार सर्वांनी करायला हवा, असे चीनमधील हेबई मेडिकल युनिव्हर्सिटीचे अभ्यासक शेंग आणि गँग लियू यांनी म्हटले.
डोळ्यावर झोप, मात्र...डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी या संदर्भात म्हटले आहे की, रात्री झोपण्याच्या आधी रील्स बघण्याचे व्यसन वाढले आहे. डोळ्यावर झोप असूनही हे लोक रील्स बघण्यासाठी जागरण करतात. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. टेलिव्हिजन पाहणे, गेम खेळणे, संगणक वापरताना काही शारीरिक क्रिया होत असतात; पण रात्री अनेक लोक अंथरुणावर लोळत रील्स पाहत असतात.त्यामुळे शारीरिक क्रिया होत नाहीत. शरीराचे चलनवलन होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने त्या व्यक्तीस उच्च रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता असते.