कोरोनाचा फटका! डिस्नेचा मोठा निर्णय, थीम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात

By ravalnath.patil | Published: September 30, 2020 08:27 AM2020-09-30T08:27:10+5:302020-09-30T08:48:20+5:30

कोरोनामुळे दीर्घकालीन परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बहुतेक थीम पार्कमधील कर्मचार्‍यांना काढून टाकले जाईल, असे कंपनीने मंगळवारी जाहीर केले.

Disney to lay off 28,000 theme park employees in US | कोरोनाचा फटका! डिस्नेचा मोठा निर्णय, थीम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात

कोरोनाचा फटका! डिस्नेचा मोठा निर्णय, थीम पार्कमधील २८ हजार कर्मचाऱ्यांची होणार कपात

Next
ठळक मुद्देआता नव्या धोरणांतर्गत कपातीची घोषणा केल्यानंतर कर्मचार्‍यांची संख्या ८२ हजारांच्या जवळपास होईल.

जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला आहे. या कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्राला कोरोनाचा फटका बसला आहे. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध डिस्ने कंपनीने आता आपल्या थीम पार्कमध्ये काम करणाऱ्या २८ हजार कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे दीर्घकालीन परिणामाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बहुतेक थीम पार्कमधील कर्मचार्‍यांना काढून टाकले जाईल, असे कंपनीने मंगळवारी जाहीर केले.

हा निर्णय अत्यंत वेदनादायक आहे. पण कोविड-१९ मुळे व्यवसायावर गंभीर परिणाम झाला. तसेच, सामाजिक अंतर नियमांची मर्यादा, कमीतकमी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या आणि दीर्घकाळापर्यंत असणारा कोरोना साथीचा रोग यांसारख्या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात हाच एकमेव पर्याय असल्याचे डिस्नेचे अध्यक्ष जोश डी आमारो यांनी सांगितले.

डिस्ने आपल्या थीम पार्कमधील जवळपास २८ हजार किंवा कर्मचार्‍यांपैकी एक चतुर्थांश कर्मचार्‍यांची कपात केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, फक्त कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामधील डिस्नेच्या थीम पार्कमध्ये कोरोनाच्या आधी सुमारे १,१०,००० कर्मचारी कार्यरत होते. आता नव्या धोरणांतर्गत कपातीची घोषणा केल्यानंतर कर्मचार्‍यांची संख्या ८२ हजारांच्या जवळपास होईल.

सध्या कॅलिफोर्नियात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेली बंदी उठविण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही, जेणेकरून डिस्नेलँड पुन्हा उघडले जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे जोश डी आमारो यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. जुलैच्या मध्यात फ्लोरिडामध्ये वॉल्ट डिस्ने वर्ल्ड अंशतः पुन्हा उघडले होते.

दरम्यान, सध्या कोरोनामुळे याठिकाणी फारच कमी पर्यटक दाखल झाले. मीडिया रिपोर्टनुसार, डिस्ने आता कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांशी बोलणीही सुरू करेल. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे ७,१८०,४११ रुग्ण आढळले आहेत आणि २,०५,७७४ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.  
 

Read in English

Web Title: Disney to lay off 28,000 theme park employees in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.