भारतातून पळून जाऊन मलेशियामध्ये लपलेला वादग्रस्त इस्लामिक अभ्यासक झाकीर नाईक याच्याबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. झाकीर नाईक याला एड्स झाला असून, त्यावर तो उपचार घेत असल्याचा दावा काही सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आला होता. मात्र आता स्वत: झाकीर नाईक याने समोर येत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
आपल्याला एड्स झाल्याचं वृत्त फेटाळून लावताना झाकीर नाईक याने सोशल मीडियावरून पसरवण्यात येत असलेल्या या बातम्या खोट्या आणि द्वेष पसरवण्याची चाल असल्याचा दावा केला. तसेच आपली प्रकृती एकदम ठणठणीत असून, या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे सांगितले.
तर झाकीर नाईकचा वकील अकबरदीन याने सांगितले की, झाकीर नाईक आता या अफवा पसरवणाऱ्यांच्या पार्श्वभूमीचा तपास करत आहे. तसेच त्यांच्याविरोधात लवकरच कायदेशीर कारवाई करण्याबाबतही तो विचार करत आहे. झाकीर नाईकची प्रचंड लोकप्रियता हे या अफवा पसरवण्यामागचं नेमकं कारण आहे. तसेच झाकीर नाईकला बदनाम करण्यासाठी फेक न्यूजचा हत्यारासारखा वापर केला जात आहे. मी जेव्हा झाकीर नाईकला भेटलो होतो. तेव्हा त्याची प्रकृती सामान्य होती, असेही अकबरदीन याने शेवटी सांगितले.
इस्लामिक अभ्यासक आणि प्रचारक असलेल्या झाकीर नाईक याने मनी लाँड्रिगचे आरोप झाल्यानंतर २०१७ साली भारत सोडून मलेशियामध्ये पळ काढला होता.