Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध, हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात प्रदीर्घ चाललेले युद्ध आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती नष्ट झाली. अमेरकेसह अनेक देश, हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच युद्धविरामही होऊ शकतो. मात्र, आता रशियावर एक असा आरोप करण्यात आला आहे, जो ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, रशियाने हजारो युक्रेनियन मुलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या खासदाराने पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला विचारले की, रशिया-युक्रेन थांबवण्यासाठी झालेल्या चर्चेत रशियन सैनिकांनी अपहरण केलेल्या 19,556 मुलांच्या सुरक्षित परतीचा उल्लेखही होता का? यामुळेच आता त्या हजारो युक्रेनियन मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणाला वेग आला आहे. ब्रिटिश खासदारांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत ही मुले सुखरूप परत येत नाहीत, तोपर्यंत शांततेची चर्चा होऊ शकत नाही.
पंतप्रधानांनी दिले हे उत्तर...बीबीसीच्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चेदरम्यान मजूर पक्षाच्या खासदार जोहाना बॅक्स्टर यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांना विचारले की, युक्रेनमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियाने आधी अपहरण केलेल्या 19,556 मुलांना सुरक्षितपणे परत करावी लागेल. याच्याशी तुम्ही सहमत आहात का?
या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, तुमचा राग पूर्णपणे योग्य आहे. या मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षित परतीची खात्री करू. त्याशिवाय शांतता प्रस्थापित करण्याबाबत कोणतीही चर्चा पुढे जाऊ शकत नाही. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांनी खासदाराचे आभार मानले आणि असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले पाहिजेत, असेही म्हटले.
19,546 मुले बेपत्ता, 599 मरण पावली युक्रेन सरकारचा अंदाज आहे की, 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून किमान 19,500 मुलांना युक्रेनमधून रशियात नेण्यात आले आहे. त्यापैकी केवळ 388 मुले त्यांच्या घरी परतली आहेत. या सर्व मुलांचे वय 3 ते 10 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रशियाने या आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका अहवालानुसार या युद्धात सुमारे 19,546 मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी 599 जणांचा मृत्यू झाला आहे.