शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:22 IST2025-12-22T09:22:21+5:302025-12-22T09:22:48+5:30
हादी यांच्या 'इन्कलाब मंच' पक्षाने शनिवारी अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. या काळात हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
बांगलादेशातील युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी फैसल करीम मसूद हा परदेशात त्यातही भारतात पळून गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेश पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, आरोपीने देश सोडल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी काय म्हटले?
रविवारी एका तातडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना अतिरिक्त पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, "मुख्य संशयित फैसल करीम मसूद सध्या नेमका कुठे आहे, याबद्दल आमच्याकडे कोणतीही निश्चित माहिती नाही. मात्र, तो देश सोडून पळून गेल्याची बातमी देणारा कोणताही विश्वासार्ह पुरावा अद्याप समोर आलेला नाही. आमचे गुप्तचर विभाग आणि पोलीस दल त्याला शोधण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत."
सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम
हादी यांच्या 'इन्कलाब मंच' पक्षाने शनिवारी अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. या काळात हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या दबावानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.
वसतिगृहाचे नाव बदलले: 'बंगबंधू' ऐवजी आता 'शरीफ उस्मान हादी'
शरीफ उस्मान हादी हे गेल्या वर्षी शेख हसीना सरकार उलथवून टाकणाऱ्या 'जुलै विद्रोहा'तील प्रमुख तरुण नेते होते. त्यांच्या निधनानंतर ढाका विद्यापीठातील 'बंगबंधू शेख मुजीबुर रहमान' वसतिगृहाचे नाव बदलून आता 'शहीद शरीफ उस्मान हादी हॉल' असे करण्यात आले आहे. वसतिगृहातील विद्यार्थी संघटनेने मुख्य प्रवेशद्वारावरील जुनी पाटी काढून नवीन पाटी लावली आहे. तसेच, इमारतीवरील शेख मुजीबुर रहमान यांचे भित्तिचित्रही पुसून टाकण्यात आले आहे.
नेमकी घटना काय होती?
१२ डिसेंबर रोजी ढाक्याच्या बिजयनगर भागात एका निवडणूक प्रचारादरम्यान मास्क घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी हादी यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी हादी यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते, मात्र गुरुवारी (१९ डिसेंबर) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण बांगलादेशात ठिकठिकाणी हल्ले आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.
विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच वसतिगृहाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "विद्यार्थ्यांच्या इच्छेखातर आम्ही क्रेनच्या साहाय्याने जुनी पाटी हटवली आहे," असे हॉल कौन्सिलच्या नेत्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे बांगलादेशातील राजकीय आणि शैक्षणिक वातावरण कमालीचे तापलेले आहे.