पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:27 IST2025-11-03T14:25:20+5:302025-11-03T14:27:25+5:30
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, ते देश आता त्यांच्या चाचण्या करत आहेत, मात्र हे सगळं बिनबोभाट सुरू आहे.

पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
जगभरातील अनेक देश आता अणु शर्यतीत उतरले आहेत. पाकिस्तान आणि रशियासोबतच आणखी काही देश सध्या अणुचाचणी करत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी म्हटले होते की, आम्ही युद्ध विभागाला अण्वस्त्रांचे परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. याच दरम्यान आता त्यांनी इतर देशांबद्दल देखील वक्तव्य केले आहे. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा भारताचं टेंशन वाढवतो की काय याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
सीबीएससोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, ते देश आता त्यांच्या चाचण्या करत आहेत, मात्र हे सगळं बिनबोभाट सुरू आहे. जगाला याबद्दल कल्पना नाही. यावेळी ट्रम्प म्हणाले की, "रशिया अणुचाचणी करतंय, चीन देखील चाचणी करतंय, पण कुणीही याविषयी चकार शब्द काढत नाही. आपण एका मुक्त समाजात वावरतो, आपण वेगळे आहोत. आपण यावर नक्कीच बोलू.. त्यांच्याकडे यावर परखडपणे लिहू शकतील असे पत्रकार नाहीत."
रशिया आणि पाकिस्तानचे नाव घेतले
डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी आणखी काही देशांची नावे घेतली. यात उत्तर कोरिया आणि पाकिस्तान देखील अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा त्यांनी केला. याच मुलाखतीत त्यांनी दावा केला की, भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते, मात्र मी टॅरिफ आणि ट्रेडचा मुद्दा मध्ये आणून हे युद्ध रोखले. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी मध्यस्थी केली नसती तर लाखो लोकांचा जीव गेला असता.
याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, "अण्वस्त्रांची चाचणी करणारे देश तुम्हाला याविषयी काहीही सांगणार नाहीत. या सगळ्या चाचण्या भूगर्भात सुरू आहेत. त्यामुळे काय चाललं आहे, यांची लोकांनाही काही कल्पना नाही. लोकांना फक्त व्हायब्रेशन जाणवतात." मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर लक्ष ठेवून असणाऱ्या काही केंद्रांना जमिनीखाली असे धक्के जाणवले, ज्यांचे भूकंपाशी साधर्म्य होते. मात्र, या गुप्तपणे सुरू असलेल्या अणु चाचण्या आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
अमेरिकाही चाचण्या करणार पण...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावर केल्या जाणाऱ्या अण्वस्त्र चाचण्यांमध्ये कोणतेही स्फोट घडवून आणले जाणार नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांनी याविषयी माहिती देताना म्हटले की, "आम्ही ज्या चाचण्या करणार आहोत, त्या केवळ सिस्टमची तपासणी आहेत. यात कोणतेही अणुस्फोट केले जाणार नाहीत. आम्ही याला नॉन-क्रिटीकल स्फोट म्हणतो. " ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर असे म्हटले होते की, ते देशाच्या अण्वस्त्र चाचणीवरील दशकांपासूनची बंदी संपवण्याची तयारी करत आहेत.