संरक्षण, ऊर्जेस बळ! PM मोदी-मॅक्रॉन यांच्यात चर्चा; स्वत: विमानतळावर सोडायला आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 08:33 IST2025-02-13T08:33:14+5:302025-02-13T08:33:46+5:30
मोदी बुधवारी फ्रान्सहून अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी स्वत: मॅक्रॅान हे मार्सेलिस येथील विमानतळावर मोदींना निरोप देण्यासाठी आले

संरक्षण, ऊर्जेस बळ! PM मोदी-मॅक्रॉन यांच्यात चर्चा; स्वत: विमानतळावर सोडायला आले
पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी फ्रान्स दौऱ्यानंतर अमेरिकेला रवाना झाले. फ्रान्स दौऱ्यात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा या विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली.
आरोग्याबाबत डिजिटल माध्यमातून सुविधा, आरोग्यतज्ज्ञांमध्ये होणारे आदानप्रदान या गोष्टींबाबत दोन्ही देशांत असलेल्या सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी मॅक्रॉन या दोघांनी घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अणुभट्टी बांधण्याचा मनोदय दोन्ही देशांनी व्यक्त केला.
अमेरिकेसोबत महत्त्वाचे करार?
मोदी बुधवारी फ्रान्सहून अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी स्वत: मॅक्रॅान हे मार्सेलिस येथील विमानतळावर मोदींना निरोप देण्यासाठी आले. अमेरिका दौऱ्यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. तसेच दोन्ही देशांत महत्त्वाचे करार होण्याचीही शक्यता आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही आठवड्यातच ट्रम्प यांना भेट देणारे मोदी हे चौथे परदेशी नेते असतील.
सावरकरांच्या आठवणी जागवल्या
फ्रान्समधील मार्सेलिस बंदराजवळ उभ्या असलेल्या बोटीच्या पोर्टहोलमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भर समुद्रात उडी घेऊन स्वत:च्या सुटकेचा साहसी प्रयत्न ८ जुलै १९१० रोजी केला होता. या महान क्षणाची आठवण जागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स दौऱ्यादरम्यान मार्सेलिस येथे बुधवारी सावरकरांना आदरांजली अर्पण केली.
भारतीयांना अमानुषपणे का वागवले हे विचारा?
अमेरिकेतील भारतातील स्थलांतरितांना मायदेशी पाठविताना त्यांना अमानुष वागणूक देऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले घनिष्ठ मित्र व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगायला हवे होते. भारतीयांना अशी वागणूक का दिली, असा प्रश्न त्यांनी ट्रम्प यांना विचारायला हवा, असे खरगे यांनी म्हटले आहे. मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्यावेळी ते ट्रम्प यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे वक्तव्य केले.