"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:22 IST2025-05-19T15:14:26+5:302025-05-19T15:22:08+5:30
PM Modi reaction on Joe Biden Cancer: ८२ वर्षांच्या जो बायडेन यांना स्टेज ४ चा कॅन्सर झाला आहे

"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
PM Modi reaction on Joe Biden Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भात त्यांच्या कार्यालयातून एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आले. जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असून, हा आजार त्यांच्या शरीरात वेगाने पसरत आहे. चिंताजनक बाब म्हणजे हा कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पोहोचला आहे. सध्या त्यांना स्टेज ४ चा कॅन्सर आहे. जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या वृत्ताने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ८२ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीचा त्रास होता. यासाठी त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांचा सल्ला घेतला. जेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी बायडेन यांच्या आजाराबद्दल कळल्यावर ट्विट केले आहे. "जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल ऐकून खूप काळजी वाटली. त्यांनी लवकर आणि पूर्ण बरे व्हावे माझ्या सदिच्छा. या संघर्षाच्या काळात आम्ही सर्वजण डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत," असे मोदींनी ट्विट केले.
Deeply concerned to hear about @JoeBiden's health. Extend our best wishes to him for a quick and full recovery. Our thoughts are with Dr. Jill Biden and the family.
— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2025
जो बायडेन यांना कर्करोगाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी तपासणी करून घेतली. त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, जो बायडेन आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचार पर्यायांवर चर्चा करत आहेत. बायडेन यांना झालेला हा आजार अधिक आक्रमक आहे. त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे.
काय आहे प्रोटेस्ट कॅन्सर?
जो बायडेन यांना झालेला कर्करोग खूप धोकादायक आहे. प्रोटेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा एक गंभीर आजार आहे. प्रोस्टेट ग्रंथीमध्ये याची सुरुवात होते. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि गुदाशयासमोर स्थित असते, जी वीर्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. जो बायडेन यांचा कर्करोग अतिशय आक्रमक आहे, म्हणून तो हाडांमध्ये पसरला आहे. प्रोस्टेट कर्करोग हळूहळू वाढू शकतो, परंतु काही प्रकरणांमध्ये तो आक्रमक होऊ शकतो आणि शरीराच्या इतर भागांमध्ये, हाडे किंवा लिम्फ नोड्समध्ये पसरण्याची शक्यता असते.