फाशीची शिक्षा झालेल्या त्या ८ भारतीय माजी नौसैनिकांसाठी १८ डिसेंबर ठरणार महत्त्वाचा, जीवदान मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:59 IST2023-11-01T13:58:40+5:302023-11-01T13:59:17+5:30
Ex-Indian Navy Officials Sentenced To Death In Qatar: हेरगिरीच्या कथित प्रकरणामध्ये भारताच्या ८ माजी नौसैनिकांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. आता या ८ भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.

फाशीची शिक्षा झालेल्या त्या ८ भारतीय माजी नौसैनिकांसाठी १८ डिसेंबर ठरणार महत्त्वाचा, जीवदान मिळणार?
हेरगिरीच्या कथित प्रकरणामध्ये भारताच्या ८ माजी नौसैनिकांना कतारमधील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. आता या ८ भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. सरकारपासून नौदलप्रमुखांपर्यंत सर्वांनी या माजी सैनिकांना वाचवण्यासाठी शक्यतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या प्रकरणी सरकार राजनैतिक प्रयत्नांसोबतच कायदेशीर पर्यायांचीही चाचपणी केली जात आहे. असं असलं तरी शिक्षा झालेल्या ८ जणांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी १८ डिसेंबर ही तारीख महत्त्वाची ठरणार आहे. कारण याच दिवशी त्यांच्या भविष्याचा फैसला होण्याची शक्यता आहे.
१८ डिसेंबर रोजी कतारच्या कोर्टाने शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीयांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे १८ डिसेंबर रोजी कतारमध्ये नॅशनल डे असतो. या दिवशी कतारचे आमीर हे काही कैद्यांवर दया दाखवून त्यांची शिक्षा माफ करत असतात. त्यामुळे शिक्षाप्राप्त आठ भारतीय नौसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. तेथील कायदा आमीरांना कतारच्या नॅशनल डे दिवशी कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकारा देतो. तसेच भारत सरकारही या आठ जणांच्या सुटकेसाठी राजनैतिक मार्गांनी आमीर यांची माफी देण्यासाठी मनधरणी करू शकते.
कतारमधील कोर्टाने अल दहरा नावाच्या एका खासगी सुरक्षा कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांना २६ ऑक्टोबर रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालाची माहिती भारताच धडकताच खळबळ उडाली होती. भारत सरकारने हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले होते. या आठ जणांना गतवर्षी अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली, याबाबतची माहिती समोर आली नव्हती. दरम्यान, शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर या सर्वांनी इस्राइलसाठी हेरगिरी केली, असा आरोप ठेवत ही शिक्षा सुनावण्यात आल्याची त्रोटक माहिती समोर आली आहे.
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी नौसैनिकांमध्ये कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पुर्णेंदू तिवारी, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे.