Coronavirus : कोरोनाचे जगातील एकचतुर्थांश मृत्यू झाले एकट्या अमेरिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 06:30 IST2020-04-26T03:50:56+5:302020-04-26T06:30:23+5:30
देशातील ९ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शनिवारपर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर पोहचली आहे.

Coronavirus : कोरोनाचे जगातील एकचतुर्थांश मृत्यू झाले एकट्या अमेरिकेत
वॉशिंग्टन : जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांपैकी एकचतुर्थांश मृत्यू हे एकट्या अमेरिकेत झाले आहेत. तसेच, संसर्गाचे एक तृतियांश रुग्णही अमेरिकेत आहेत. चीनच्या वुहान शहरातून नोव्हेंबरमध्ये कोरोनाची साथ सुरु झाली होती. जगात आतापर्यंत जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, २७ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. ‘जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठा’च्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. देशातील ९ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. शनिवारपर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५१ हजारांवर पोहचली आहे.
स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि टर्की या देशांच्या एकूण रुग्णांपेक्षा अमेरिकेतील रुग्ण संख्या अधिक आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये याचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. मात्र, अमेरिकेतील कोरोनाचा वाईट काळ आता संपत आला असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
>काय म्हणाले ट्रम्प?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, देशात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या कमी झाली आहे. गत आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये ३८ टक्के रुग्ण समोर आले होते. या आठवड्यात ही संख्या कमी होऊन २८ टक्के झाली आहे. एक आठवडा अगोदरच्या तुलनेत न्यूयॉर्कमध्ये नवे रुग्ण ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर, मृत्युमुखी पडणाºयांची संख्याही ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. ट्रम्प म्हणाले की, रुग्णांची संख्या घटत असल्याने अर्ध्या राज्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत.
>युरोपमधील मृतांची संख्या १ लाख २0 हजार
यूरोपमधील कोरोनाच्या मृतांची संख्या १ लाख २० हजार १४० एवढी झाली आहे. यातील बहुतांश मृत्यू इटली, फ्रान्स, स्पेन आणि ब्रिटनमधील आहेत.
युरोपात आतापर्यंत कोरोनाचे १३ लाख ४४ हजारांवर रुग्ण समोर आले आहेत. इटली, स्पेन, फ्रान्स या देशाला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
दरम्यान, ब्रिटनमधील भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे की, लॉकडाऊन आणि सामाजिक अंतर नियमात सूट देण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे.