CoronaVirus News: Hydroxychloroquine suspension: WHO | CoronaVirus News: हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध देण्यास स्थगिती- डब्ल्यूएचओ

CoronaVirus News: हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध देण्यास स्थगिती- डब्ल्यूएचओ

जिनिव्हा : हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोरोनाबाधित रुग्णांना देण्यास जागतिक आरोग्य संघटनेने स्थगिती दिली आहे. या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याची चिन्हे आढळत नसल्याने हा निर्णय घेतला आहे. आजवर केलेल्या प्रयोगांचा जूनमध्ये जागतिक आरोग्य संघटना आढावा घेईल.

भारतामध्ये मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधक औषध म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देण्याची परवानगी केंद्रीय आरोग्य खात्याने दिली आहे. त्यामुळे भारतात कोरोना रुग्णाचे नातेवाईक, डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी यांना अ‍ॅझिथ्रोमायसिन या औषधाबरोबर हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्यात येत आहेत.

जगभरात काही ठिकाणी कोरोना रुग्णांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन सुरू असलेले प्रयोग पूर्ण करू दिले जातील. मात्र रुग्णांना हे औषध देण्यास सध्या जागतिक आरोग्य संघटनेने स्थगिती दिली आहे. या औषधाने होणारे लाभ, तोटे याबद्दल काहीच चिन्हे नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध दिल्याने कोरोना रुग्ण बरे होण्यासाठी कोणताही फायदा झाला नाही, असा एक लेख लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाच्या बाजूने व विरोधात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये वादंगही सुरू आहेत. या महिन्याच्या प्रारंभी ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या लेखात म्हटले होते की, कोरोना रुग्णांपैकी ज्यांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध दिले त्यांची प्रकृती हे औषध न घेतलेल्यांपेक्षा जास्त बिघडल्याचे आढळून आले. मात्र या उलट निरीक्षणे इंटरनॅशनल जर्नल आॅफ अँँटिमायक्रोबियल एजंट्स या नियतकालिकातील लेखात फ्रेंच शास्त्रज्ञांनी नोंदविली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या २० रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध दिल्यानंतर, त्यांचा आजार बरा होण्यास मदत झाली असे प्रयोगांत आढळून आले आहे.

जागतिक स्तरावर ताणतणाव

मलेरिया अन्य काही आजारांवर वापरण्यात येणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण घेत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. त्यावर काही वैद्यकीय तज्ज्ञांनी टीका केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ््यांचा पुरवठा करावा म्हणून अमेरिकेने भारतावर दबावही आणला होता. हे औषध न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील अशी धमकीही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधावरून जागतिक राजकारणामध्ये ताणतणावाचे प्रसंग घडत असताना जागतिक आरोग्य संघटनेनेही नव्या निर्णयाने त्यात भरच टाकली आहे.

एचसीक्यूचा फायदा कमी पण धोकाही शून्य

जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) औषधाचा वापर न करण्याची मार्गदर्शिका प्रसिद्ध केली असली तरी भारतात मात्र या औषधाचा वापर सुरूच राहणार आहे. भारतात या औषधाचा प्रभाव दिसू लागला. किरकोळ साइड इफेक्ट्स वगळता हे औषध प्रभावी ठरताना दिसते. औषधाची मात्रा लागू होण्याची शक्यता कमीच असली तरी धोकाही शून्य आहे, अशा शब्दात आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी उपचाराचे समर्थन केले. भारतात सुरू असलेल्या अभ्यासाचे निष्कर्षही त्यांनी मांडले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Hydroxychloroquine suspension: WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.