CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 07:03 IST2020-05-20T00:25:27+5:302020-05-20T07:03:33+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे.

CoronaVirus News : संसर्ग टाळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प घेतात हायड्रोक्लोरोक्विन
न्यूयॉर्क : कोरोना विषाणूचा संसर्ग न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेत आहेत. या औषधावरून अमेरिकेत झालेले वाद निरर्थक आहेत असेही ते म्हणाले.
वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गेल्या दीड आठवड्यापासून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेण्यास मी सुरुवात केली आहे. या गुणकारी औषधाबाबत अनेक चांगल्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. हे औषध घेतल्याने अमुक एक दुष्परिणाम होतील असे जे बोलले जाते त्यात तथ्य नाही. मी हे औषध घेतल्यानंतरही धडधाकट आहे. तुमच्यासमोर उभा आहे, असेही ते म्हणाले.
हायड्रोेक्लोरोक्विन या औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरस्कार केल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक स्कमर यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी विशिष्ट औषधामुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध करता येतो असे सांगून विनाकारण आशा पल्लवित केल्या आहेत. ट्रम्प करत असलेली कृती भयंकर आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रोक्लोेरोक्विन हे औषध आपल्याला देण्यात यावे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील डॉक्टरना सांगितले होते. ट्रम्प यांच्या म्हणण्याला डॉक्टरांनी एका पत्रकाद्वारे दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची रोज कोरोना चाचणी केली जाते. या विषाणूचा त्यांना संसर्ग झालेला नसल्याचा निष्कर्ष त्यातून आला आहे. हायड्रोक्लोरोक्विन हे औषध ४० वर्षांपासून मलेरिया व इतर आजारांवर घेतले जाते. संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी हे औषध घेत आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.