CoronaVirus News: जगात कोरोनाने 34 कोटी 35 लाख जण बाधित; २७ कोटी कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 06:23 IST2022-01-22T06:23:25+5:302022-01-22T06:23:53+5:30
६ कोटी लोकांवर उपचार सुरू

CoronaVirus News: जगात कोरोनाने 34 कोटी 35 लाख जण बाधित; २७ कोटी कोरोनामुक्त
वाॅशिंग्टन : जगात गेल्या चोवीस तासांमध्ये ३५.५४ लाख नवे रुग्ण आढळून आले तर आणखी ९०७० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३४ कोटी ३५ लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेमध्ये ७ कोटींहून अधिक कोरोनाबाधित असून, त्यापैकी ४ कोटी ४० लाख लोक बरे झाले.
जगभरात २७ कोटी ५१ लाख लोक कोरोनामुक्त झाले असून मरण पावलेल्यांचा आकडा ५५ लाख ९४ हजारांवर गेला आहे. ६ कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरू असून त्यातील ९६ हजार जणांची प्रकृती गंभीर आहे. अमेरिकेत ८ लाख ८३ हजार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. सर्वाधिक कोरोना रुग्ण अमेरिकेत असून त्यानंतर भारत, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, तुर्कस्थान, इटली, स्पेन, जर्मनी यांचा क्रमांक लागतो.
ब्राझिलमध्ये २ कोटी ३५ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी १८ लाख लोक बरे झाले व ६ लाख २२ हजार जणांचा मृत्यू झाला. युरोपमध्ये ओमायक्राॅन संसर्गाचा प्रसार झपाट्याने झाला असला तरी तिथे ब्रिटनने काही निर्बंध शिथिल केले. त्याचे अनुकरण आणखी काही देश करण्याची शक्यता आहे. आफ्रिकेमध्ये लसीकरणाचे प्रमाण खूप कमी आहे.
जपानमध्ये कडक निर्बंध लागू
जपानमध्ये ओमायक्राॅनच्या वाढत्या संसर्गामुळे तिथे शुक्रवारपासून अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले.
त्यामुळे रेस्टॉरंट, पब, दुकाने, मॉल नेहमीपेक्षा लवकर बंद करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. लाॅकडाऊन करण्याचा निर्णय न घेता अन्य उपायांनी कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा जपानचा प्रयत्न आहे.
कोरोना, हवामान, संघर्षामुळे जगाची बिकट स्थिती
कोरोना, हवामान व संघर्ष यामुळे जगाची अवस्था मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक बिकट झाली आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी सांगितले. या संघटनेच्या सरचिटणीस पदावरील दुसऱ्या कारकीर्दीस गुटेरस यांनी सुरुवात केली. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत मांडले.