CoronaVirus News: चीनमध्ये 'त्या' मार्गानं पार्सल होतोय कोरोना; ड्रॅगनला भलताच संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 05:36 IST2021-11-14T05:36:17+5:302021-11-14T05:36:37+5:30
मुलांच्या कपड्यांच्या पार्सलद्वारे कोरोना प्रसार; चीनला संशय; निर्बंध अधिक कठोर

CoronaVirus News: चीनमध्ये 'त्या' मार्गानं पार्सल होतोय कोरोना; ड्रॅगनला भलताच संशय
बीजिंग : लहान मुलांच्या कपड्यांच्या पार्सलमधून कोरोना विषाणूंचा प्रसार होत असल्याचा चीन सरकारला संशय आहे. सध्या चीनमध्ये सर्वांत मोठा ऑनलाईन खरेदी उत्सव सुरू असून, त्यामुळेही कोरोना प्रसारात भर पडण्याची शक्यता आहे.
हेबेई प्रांतामध्ये लहान मुलांचे कपडे बनविणाऱ्या एका कंपनीतील तीन कामगारांना कोरोना झाल्याचे नुकतेच आढळून आले होते. कपड्याच्या या कंपनीतील पार्सल्स सुमारे १२०० किमी दूरवरील ठिकाणी ज्या घरांत गेली, तेथील माणसांचीही तपासणीही करण्यात आली. त्यात कोरोनाचा प्रसार झाल्याचे आढळले नाही; पण कोणत्याही शंकेला वाव नको म्हणून ही काळजी घेण्यात येत आहे.
ज्या लोकांनी गेल्या महिन्यात कपड्यांची ऑनलाईन खरेदी केली असेल, त्यांनीही त्याची माहिती अधिकाऱ्यांना कळवावी, असे चीनने आदेश दिले आहेत. अशा लोकांचीही कोरोना चाचणी करण्यात येत आहे.