Coronavirus: यूएईत अडकलेले भारतीय उद्यापासून परतू लागणार; नौदलाचे जहाजही दुबईला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 23:44 IST2020-05-05T23:44:07+5:302020-05-05T23:44:20+5:30
या प्राधान्य यादीत धोक्यात असलेले कामगार, तातडीच्या वैद्यकीय उपचारांची (गरोदर महिला व वयोवृद्धांसह) गरज असलेले लोक आणि ज्यांचा रोजगार गेला आहे यांचा समावेश आहे.

Coronavirus: यूएईत अडकलेले भारतीय उद्यापासून परतू लागणार; नौदलाचे जहाजही दुबईला
दुबई : कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) उद्रेकानंतर संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्याचे काम गुरुवारपासून सुरू होईल. त्यादिवशी दोन विशेष विमाने त्यांना घेऊन उड्डाण करतील. या भारतीयांमध्ये बहुसंख्य केरळचे आहेत, असे यूएईतील भारतीय राजदूत पवन कपूर यांनी म्हटले.
जारी करण्यात आलेली तिकिटे घेण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रवाशाने त्याने एअर इंडियाशी संपर्क साधावा म्हणून त्याला फोन करून ई-मेल करणार आहोत. पहिली दोन विमान उड्डाणे गुरुवारी केरळला जातील. कारण त्या राज्यातून जास्त संख्येने अर्ज केले गेले आहेत, असे पवन कपूर यांनी म्हटल्याचे गल्फ न्यूजने वृत्त दिले. कोचीमध्ये संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, दुबईला नौदलाचे शार्दूल नावाचे जहाज भारतीयांना घेऊन येण्यासाठी पाठविण्यात आले आहे.
प्राधान्य कुणाला?
या प्राधान्य यादीत धोक्यात असलेले कामगार, तातडीच्या वैद्यकीय उपचारांची (गरोदर महिला व वयोवृद्धांसह) गरज असलेले लोक आणि ज्यांचा रोजगार गेला आहे यांचा समावेश आहे.
अबुधाबी ते कोची आणि दुबई ते कोझिकोडे या उड्डाणांसाठी प्रवाशांची अंतिम यादी अबुधाबीतील भारतीय दूतावास आणि दुबईतील भारतीय वकिलात तयार करील, असे दुबईतील भारतीय वकिलातीने सोमवारी जाहीर केले.