CoronaVirus : इंग्लंडमध्ये 'डेल्टा'चा परिणाम; लॉकडाऊन असूनही दैनंदीन कोरोना रुग्ण संख्येत एका आठवड्यात 49% वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:00 IST2021-06-04T09:58:21+5:302021-06-04T10:00:09+5:30
गेल्या गुरुवारच्या आकडेवारीचा विचार करता या संख्येत तब्बल 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या इग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे.

CoronaVirus : इंग्लंडमध्ये 'डेल्टा'चा परिणाम; लॉकडाऊन असूनही दैनंदीन कोरोना रुग्ण संख्येत एका आठवड्यात 49% वाढ
लंडन - इंग्लंडमध्ये आजही कोरोनाचा कहर सुरूच आहे. सातत्याने लॉकडाऊन असूनही येथे मार्चनंतर पहिल्यांदाच दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या एका आठवड्यात 49 टक्यांनी वाढून 5000 वर पोहोचली आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये जवळपास अर्ध्या वयस्क नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथे बुधवारी 5,274 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 26 मार्चनंतरची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. गेल्या गुरुवारच्या आकडेवारीचा विचार करता या संख्येत तब्बल 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या इग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनामुळे बुधवारी झालेले मृत्यू, हे गेल्या आठवड्याच्या तुलनेत 80 टक्के अधिक आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या 10 होती. मात्र, ही संख्या बँकांची सुट्टी आणि रिपोर्टिंगमध्ये झालेला उशीर यामुळे अधिक असू शकते.
CoronaVirus: नेपाळी कोरोना स्ट्रेनने युरोपची झोप उडविली, लसही बेकार; WHO म्हणतेय...
अत्यंत संक्रमक असलेल्या डेल्टाचा परिणाम -
इंग्लंड सरकारने म्हटले आहे, की अत्यंत संक्रमक असलेल्या डेल्टामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे, चार नव्या रुग्णांपैकी तीनहून अधिक रुग्णांसाठी डेल्टा जबाबदार आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे, की साधारणपणे सहामहिन्यांपूर्वी लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 2,64,22,303 जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. हे प्रमाण 18 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांचा विचार करता, 50.2 टक्क्यांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, यथे जवळपास 75.5 टक्के वयस्क लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे.
ब्रिटनमध्ये साकारताेय थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’; जगातील सर्वांत माेठा जलतरण तलाव
येजनेनुसार, 21 जूनला येथील लॉकडाउन संपवण्यात येणार होता. मात्र, आता ती परवानगी दिली जाईल की नाही, यावर येथील मंत्र्यांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मात्र, आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी म्हटल्याप्रमाणे, एक 'चांगला संकेत' म्हणजे, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांत लस घेतलेल्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.