Coronavirus: इस्राएलने शोधली अ‍ॅन्टीबॉडी! संशोधन पूर्ण, पेटंट घेऊन उत्पादन सुरू करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 11:07 PM2020-05-05T23:07:44+5:302020-05-05T23:08:05+5:30

या अ‍ॅन्टीबॉडी कोरोना विषाणूवर मोनोक्लोनल पद्धतीने आक्रमण करतात आणि रुग्णाच्या शरीरातील विषाणूंना निष्प्रभ करून सोडतात.

Coronavirus: Antibodies discovered by Israel! Completed research, will start production with patent | Coronavirus: इस्राएलने शोधली अ‍ॅन्टीबॉडी! संशोधन पूर्ण, पेटंट घेऊन उत्पादन सुरू करणार

Coronavirus: इस्राएलने शोधली अ‍ॅन्टीबॉडी! संशोधन पूर्ण, पेटंट घेऊन उत्पादन सुरू करणार

Next

जेरुसलेम : ‘कोविड-१९’ने संपूर्ण जगात मिळून सुमारे ३७ लाख बाधित आणि अडीच लाखांवर बळी घेतल्यानंतर, या महामारीला प्रतिबंध करणारी अ‍ॅन्टीबॉडी तयार करण्यात आल्याचा दावा इस्राएलने केला आहे. या देशाचे संरक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

नफ्ताली यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्राएल इन्स्टिट्यूट आॅफ बॉयलॉजिकल रिसर्च (आयआयबीआर) या महत्त्वपूर्ण संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनत करून हे मोठे यश मिळविले आहे. अ‍ॅन्टीबॉडीच्या संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पेटंटची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच अ‍ॅन्टीबॉडीच्या उत्पादनाला प्रारंभ करण्यात येईल.

‘‘पंतप्रधान तसेच संरक्षणमंत्र्यांचे या संशोधनावर लक्ष होते. सरकारचे प्रोत्साहन यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. पेटंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क साधून व्यावसायिक तत्त्वावर या अ‍ॅन्टीबॉडीचे उत्पादन सुरू करण्यात येईल,’’ असे यासंदर्भात सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

या अ‍ॅन्टीबॉडीची मानवी शरीरावर चाचणी घेण्यात आली की नाही, याबाबत मात्र पत्रकात काहीही माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकारची अ‍ॅन्टीबॉडी तयार करण्यासाठी प्रयोगशाळेत दीर्घकाळ संशोधन चालते. त्यानंतर अनेक चाचण्या घेण्यात येतात. या सर्व प्रक्रियेत खूप वेळ जातो. या दरम्यान अशा अ‍ॅन्टीबॉडीच्या साइड इफेक्टवरही संशोधन केले जाते.

इस्राएलचे वैद्यकीय संशोधन अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या तोडीस तोड मानले जाते; पण त्या देशात याबाबत प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत केले जाते. आता इस्राएलने अ‍ॅन्टीबॉडी शोधली असल्यास याबाबतचे संशोधन तेथे खूप आधीपासून सुरू झाले होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. जपान, इटली यांसारख्यया बाधित देशांमधून कोरोना विषाणूचे नमुने मोठ्या प्रमाणावर इस्राएलमध्ये मागविण्यात आल्याचे वृत्त इस्राएलमधील माध्यमांनी पूर्वीच दिले होते. इस्राएलमध्ये आजवर १६ हजारांवर लोकांना या विषाणूची लागण झाली असून, सुमारे २४० बळी गेले आहेत.

मार्चमध्येच लागला होता शोध?
इस्राएल इन्स्टिट्यूट ऑफ बॉयलॉजिकल रिसर्च अर्थात आयआयबीआर या संस्थेने कोरोना विषाणूची जैविक रचना, त्याची वैशिष्ट्ये, रोगनिदान आणि प्रतिबंध करण्याच्या अ‍ॅन्टीबॉडीसंदर्भात महत्त्वपूर्ण शोध लावल्याचे वृत्त इस्राएलमधील एका प्रतिष्ठित दैनिकाने मार्चअखेरीस दिले होते. मात्र, संरक्षण मंत्रालयाने तेव्हा हे वृत्त फेटाळून लावाताना ‘यासंदर्भात देण्यासारखी माहिती असेल तर ती माध्यमांना नक्कीच पुरवली जाईल,’ असे उत्तर दिले होते.

आयआयबीआर ही संस्था इस्राएलच्या संरक्षण विभागाची ‘विज्ञान’विषयक संस्था म्हणून १९५२ मध्ये स्थापन करण्यात आली. नंतर, तिचे नागरी संस्थेत रुपांतर झाले. या संस्थेवर पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येत असले, तरी संरक्षण मंत्रालयासोबत तिचा कायम संपर्क असतो.

असा निष्प्रभ होणार विषाणू
या अ‍ॅन्टीबॉडी कोरोना विषाणूवर मोनोक्लोनल पद्धतीने आक्रमण करतात आणि रुग्णाच्या शरीरातील विषाणूंना निष्प्रभ करून सोडतात. कोरोना विषाणूमधील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रायबोझ न्यूक्लिक अ‍ॅसिड म्हणजेच आरएनएला ही अ‍ॅन्टीबॉडी कमकुवत करून रुग्णाची या आजारातून सुटका करणार आहे.

आमच्या शास्त्रज्ञांनी मिळविलेले हे यश अभिमानास्पद आहे. या क्रांतिकारी यशाबाबत मी इस्राएल इन्स्टिट्यूट आॅफ बॉयलॉजिकल रिसर्चच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. ज्यू शास्त्रज्ञांची बुद्धिमत्ता आणि कल्पनाशीलता जगाच्या कल्याणाकरिता उपयोगात येणार आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
- नफ्ताली बेनेट, संरक्षणमंत्री, इस्राएल

Web Title: Coronavirus: Antibodies discovered by Israel! Completed research, will start production with patent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.