Coronavirus : पाकिस्तानात तबलिगी जमातचे ४२९ सदस्य संक्रमित; प्रसिद्ध मौलानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 09:30 IST2020-04-18T09:28:43+5:302020-04-18T09:30:09+5:30
इस्लामाबादमध्येही तबलिगी जमातशी संबंधित ९ कोरोना रुग्ण सापडले आहेत.

Coronavirus : पाकिस्तानात तबलिगी जमातचे ४२९ सदस्य संक्रमित; प्रसिद्ध मौलानाचा मृत्यू
इस्लामाबादः पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रायविंड शहरात तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशभरात याचे सदस्य संक्रमित असल्याचं समोर येऊ लागलं आहे. पाकिस्तानातल्या एकट्या सिंध प्रांतात तबलिगी जमात संघटनेचे ४२९ सदस्य कोरोना व्हायरसनं संक्रमित आढळले आहेत. या सर्व सदस्यांनी रायविंडमध्ये आयोजित इज्तामामध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय पाकिस्तानात तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना यांचासुद्धा कोरोनाच्या संक्रमणानं मृत्यू झाला आहे. इस्लामाबादमध्येही तबलिगी जमातशी संबंधित ९ कोरोना रुग्ण सापडले आहेत.
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सैय्यद मुराद अली शाह यांनी सांगितलं की, पंजाब प्रांतातील रायविंडमध्ये तबलिगी जमातच्या वार्षिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांपैकी ४२९ सदस्य पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा संक्रमण पसरू नये, म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. त्याशिवाय तबलिगींशी संबंधित इतर सदस्यांचाही शोध सुरू आहे. मार्चमध्ये झालेल्या रायविंड भागातील या कार्यक्रमात ८० हजार लोक सहभागी झाले होते. त्यांचा आता पाकिस्तानातील प्रत्येक प्रांतात शोध घेतला जात आहे.
प्रसिद्ध मौलाना सुहैब रूमी यांचे निधन
पाकिस्तानमधील तबलिगींचे प्रसिद्ध मौलाना आणि फैसलाबादमधील तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या ६९ वर्षीय मौलाना सुहैब रूमी यांचे गुरुवारी कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर निधन झाले. फैसलाबादचे उपायुक्त मोहम्मद अली म्हणाले, 'मौलाना गेल्या महिन्यात लाहोरच्या रायविंडमध्ये तबलिगी जमातच्या कार्यक्रमात उपस्थित होते. दोन नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याने सांगितले की, त्याला फैसलाबादपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर एका स्वतंत्र कक्षात ठेवले गेले आहे.
पंजाबमध्ये ११०० तबलिगी सदस्यांना झाला संसर्ग
पंजाब आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, प्रांतातील तबलिगी जमातमधील ११००हून अधिक सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. लाहोर मुख्यालयात गेल्या महिन्यात तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना शोधून काढले जात असून, त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवले जात आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरण्याची कल्पना दिली होती, तरीसुद्धा लाहोरच्या रायविंड येथे तबलिगी जमातचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे पंजाब प्रांतातील तुरुंगातही कोरोना पसरला असून, तिथे संक्रमित रुग्णांची संख्या १००च्या वर गेली आहे. पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या ७२६० एवढी असून, आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.