लॉकडाऊनवर लॉकडाऊन! चीनला पुन्हा कोरोनाने घेरले; चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:43 IST2020-05-13T15:42:29+5:302020-05-13T15:43:46+5:30
एका ४५ वर्षांच्या महिलेमुळे संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात असून वुहानमधील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लॉकडाऊनवर लॉकडाऊन! चीनला पुन्हा कोरोनाने घेरले; चिंता वाढली
कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये समोर आले होते. पाहता-पाहता हा व्हायरस जगभरात पसरला. जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. कोरोनाने हळूहळू इतर देशांमध्ये शिरकाव करायला सुरूवात केली. तेव्हा जगभरात लॉकडाऊन घोषित करावा लागला.
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असताना चीनमधून कोरोना नाहीसा झाल्याची दिलासादायक बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. तेथील लॉकडाऊन हटवण्यात आले होते. हळूहळू तेथील जनजीवन पूर्ववत होत होते. कोरोनामुक्त झालेल्या चीनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चीनवासीयांसाठी हा आनंद फार काळ टिकला नाही. पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.
चीनमधील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेला वुहानमधील नागरिकांना पुन्हा एकदा कोरोनाने धडकी भरवली आहे. एकाच दिवसात ६ नवे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. वुहानमध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका ४५ वर्षांच्या महिलेमुळे संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त केली जात असून वुहानमधील सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
वुहानमधील तब्बल 1.11 कोटी लोकांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लॉकडाऊन हटवणं चीनला चांगलच महागात पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.