कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता, प्रयोगशाळेतून लीक झाला होता; ट्रम्प सत्तेवर येताच गुप्तचर संस्थेने केला मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 21:11 IST2025-01-26T21:09:30+5:302025-01-26T21:11:44+5:30
Corona : अमेरिकेत डोनाल्ड ट्र्म्प सत्तेवर येताच अमेरिकेतील गुप्तचर संस्थेने कोरोना संदर्भात मोठा दावा केला आहे.

कोरोना विषाणू नैसर्गिक नव्हता, प्रयोगशाळेतून लीक झाला होता; ट्रम्प सत्तेवर येताच गुप्तचर संस्थेने केला मोठा दावा
Corona ( Marathi News ) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. दुसऱ्या दिवशीपासूनच ट्रम्प अॅक्शनमोडवर आले आहेत. पहिल्या ट्रम्प यांनी पहिला कार्यकाळ गाजवला आहे, यामुळे आता जगभरात त्यांची चर्चा सुरू आहे. ट्रम्प सत्तेवर येताच सीआयएने कोरोना बाबत मोठा दावा केला आहे.
अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने कोरोना नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही कोरोनाव्हायरसला ट्रम्प यांनी'चिनी विषाणू' असे संबोधून शी जिनपिंग सरकारवर आरोप केले होते. अमेरिकेचा हा नवा दावा देखील महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि लाखो मृत्यूंसाठी जबाबदार असलेल्या या विषाणूच्या उत्पत्तीचा प्रश्न जागतिक स्तरावर एक मोठा प्रश्न आहे. चीनने अमेरिकेच्या अहवालाचे वर्णन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
एजन्सीने पुरावे सादर केले नाहीत
सीआयएने दाव्यात म्हटले आहे की, कोविड विषाणू निसर्गातून नव्हे तर प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे. एजन्सीने या दाव्यांवर कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. बायडेन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या विनंतीवरून हा अहवाल तयार करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयए संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या विनंतीवरून शनिवारी ते सार्वजनिक करण्यात आले.
कोरोनाव्हायरस प्रयोगशाळेतून उद्भवण्याची शक्यता नैसर्गिक नाही, तर तो जाणीवपूर्वक प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे, असा दावा सीआयएने केला आहे. कोरोना विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून चुकून बाहेर पडला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला याबाबत चिनी अधिकाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव असल्याने या प्रश्नांची उत्तरे कधीच पूर्णपणे मिळणार नाहीत, असा दावाही गुप्तचर विभागाने केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार अमेरिकेत सर्वाधिक झाला. अमेरिकेत लाखो लोकांनी प्राण गमावले. ट्रम्प यांनी त्यांच्या गेल्या कार्यकाळात कोरोना विषाणूबाबत चीनवर जोरदार निशाणा साधला होता. सार्वजनिकरित्या, त्यांनी अनेक वेळा कोरोनाव्हायरसचा उल्लेख 'चिनी विषाणू' असा केला आहे.