गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. भारतानेपाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाणी सुरू करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. दरम्यान, आता पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्यासाठी गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान सरकारने सिंधू नदीवर ६ कालवे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. हे कालवे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बांधले जातील आणि त्यामुळे सिंध प्रांतात संताप आहे. या प्रकल्पाद्वारे पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भेदभाव करण्याची तयारी करत असल्याचा आरोप सिंध प्रांतातील लोकांनी केला आहे. फक्त पंजाब-केंद्रित धोरणे का बनवली जातात या मुद्द्यावरून पाकिस्तानातील सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये आधीच बंडखोरीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, सिंधमध्ये या कालव्याच्या प्रकल्पाविरुद्धचा रोष वाढला आहे. मंगळवारी निदर्शकांनी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घराला आग लावली. सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांचे नौशहरो फिरोज जिल्ह्यात घर आहे. निषेधादरम्यान लोकांनी येथेच त्यांचे घर जाळून टाकले. याशिवाय घरात ठेवलेल्या सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली. घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांनाही आग लावण्यात आली. पाकिस्तान सरकारचा प्रकल्प सिंध नदीवर ६ कालवे बांधण्याचा आहे. या कालव्यांद्वारे चोलिस्तानमधील सिंचन व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत पीपीपी आणि शाहबाज शरीफ यांच्या पक्ष पीएमएल-एनमध्येही तणाव आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीने विरोध केला
ही ६ कालवे बांधून चोलिस्तान वाळवंटाला सिंधू नदीच्या पाण्याने सिंचन केले जाईल, असं पाकिस्तान सरकारचे मत आहे. या प्रकल्पाला पाकिस्तान पीपल्स पार्टीने विरोध केला आहे. याशिवाय सिंधमधील इतर पक्षही याच्या विरोधात आहेत. चोलिस्तान कालव्याद्वारे ४ लाख एकर जमीन सिंचनाखाली आणता येते असे पाकिस्तान सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, सिंध प्रांताला संदेश दिला जात आहे. यामुळे सिंधमध्ये पाणी संकट निर्माण होईल. सिंधमधील लोक सांगतात की, त्यांच्या वाट्याचे पाणी पंजाबला देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सिंधमधील महामार्गही यामुळे बंद करण्यात आले होते.