बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 06:48 IST2025-05-24T06:45:47+5:302025-05-24T06:48:49+5:30
बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष एकमताने निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याने ते हे पाऊल उचलणार आहेत

बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
ढाका: बांगलादेशमधील हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे समजते. देशात बदल घडवून आणण्यासाठी राजकीय पक्ष एकमताने निर्णय घेण्यात अपयशी ठरत असल्याने ते हे पाऊल उचलणार आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
बीबीसी बांगला सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार नॅशनल सिटिझन पार्टीचे प्रमुख नाहिद इस्लाम यांनी सांगितले की, देशातील राजकीय परिस्थिती आणि त्यात सुरू असलेल्या घडामोडी यामुळे युनूस चिंतेत आहेत. अशा वातावरणात आपल्याला उत्तम काम करता येईल का, याबाबत युनूस यांना शंका आहे. ते ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असून त्यांना २००६ साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. संसदीय निवडणुकांचा कालावधी ठरवण्याच्या मुद्द्यावर लष्कर व सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. बांगलादेशातील म्यानमार सीमेवरील रखाईन जिल्ह्यात मानवतावादी कॉरिडॉर बांधण्याच्या योजनेवरून लष्कर आणि सरकार आमनेसामने आले असल्याचे समोर आले आहे.
‘सर्व राजकीय पक्षांनी युनूस यांना सहकार्य करावे’
गेल्या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्या बांगलादेशचा त्याग करून भारतात रवाना झाल्या.
या विद्यार्थी आंदोलनाचे समन्वयक असलेले नाहिद इस्लाम म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी, भविष्याकरिता तसेच जनआंदोलनातून निर्माण झालेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी सर्व राजकीय पक्षांनी मुहम्मद युनूस यांना सहकार्य केले पाहिजे.
हंगामी सरकारने शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष विसर्जित केला आहे. तसेच या पक्षाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मुहम्मद युनूस यांच्यावर राजकीय पक्षांकडून सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असे वृत्तात म्हटले आहे.