पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:22 IST2025-06-01T12:20:53+5:302025-06-01T12:22:27+5:30

माजी राष्ट्राध्यक्ष सीझर गॅव्हिरिया यांनी पाकचा केला निषेध- मिलिंद देवरा

Colombia withdraws statement condoling loss of life in Pakistan said Shashi Tharoor | पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर

पाकिस्तानमधील जीवितहानीबद्दल शोक करणारे वक्तव्य कोलंबियाने घेतले मागे- शशी थरूर

बोगोटा: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या लष्करी कारवाईत पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करणारे वक्तव्य कोलंबियाने मागे घेतले आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्याने सीमेपलीकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माहिती दिल्यानंतर कोलंबियाने पूर्वीच्या भूमिकेत बदल केल्याची माहिती शिष्टमंडळाचे प्रमुख व काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिली.

थरूर यांनी सांगितले की, कोलंबियाचे परराष्ट्र उपमंत्री रोजा योलेन्डा व्हिलाविसेन्सिओ यांच्याशी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबत चर्चा केली. दोन दिवसांत कोलंबियातील महत्वाच्या नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्या देशाने पाकिस्तानच्या बाजुने केलेले विधान मागे घेतले. थरुर यांनी सोशल मीडियावर म्हटले की, कोलंबियाला भारताची भूमिका नीट समजली आहे. बोगोटा येथे भारतीय शिष्टमंडळाने चेंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे अध्यक्ष जैमे राऊल सलामांका तसेच अन्य काही नेत्यांशी भेट घेऊन त्यांना भारताची दहशतवादविरोधी भूमिका नीट समजावून सांगितली. 

‘लढ्यात इथिओपिया भारतासोबत’

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शनिवारी इथिओपियाचे उपपंतप्रधान अदेम फराह यांची भेट घेतली. दहशतवादविरोधी लढ्यात आम्ही भारतासोबत आहोत असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. तसेच कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लॅटव्हिया या देशात परराष्ट्र मंत्री अंजेझ व्हिलुमसॉन्स यांची भेट घेतली. 

माजी राष्ट्राध्यक्ष सीझर गॅव्हिरिया यांनी पाकचा केला निषेध: मिलिंद देवरा

शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा हे देखील शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील भारताची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात असून ते कोलंबियात दाखल झाले. देवरा यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, माझे मित्र आणि कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष सीझर गॅव्हिरिया यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी कारवायांचा ठाम शब्दांत निषेध केला. कोलंबियातील विरोधी पक्ष आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या लिबरल पार्टीच्या वतीने त्यांनी हा निषेध केला असेही मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

Web Title: Colombia withdraws statement condoling loss of life in Pakistan said Shashi Tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.