बापरे! झोपलेल्या तरुणीच्या कानात झुरळ शिरलं, घाईघाईत माऊथवॉश ओतलं, झाली भयंकर अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 15:23 IST2022-07-23T15:16:54+5:302022-07-23T15:23:52+5:30
तरुणीला झोपेतून उठल्यावर कानात झुरळ शिरल्याचं समजताच कान हलवून त्याला बाहेर काढू लागली.

फोटो - आजतक
झुरळ म्हटलं की अनेकांना भीती वाटते. पण हे झुरळ कानात शिरलं तर? याची कल्पनाही करायला नको. पण अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. झोपलेली असताना एका तरुणीच्या कानात अचानक झुरळ शिरलं, तिने त्याला बाहेर काढण्यासाठी माऊथवॉश ओतलं. पण हे सर्व करण्यात तिची भयंकर अवस्था झाली आहे. सिंगापूरमध्ये ही घटना घडली आहे. तरुणीला झोपेतून उठल्यावर कानात झुरळ शिरल्याचं समजताच कान हलवून त्याला बाहेर काढू लागली.
झुरळ बाहेर न आल्याने ती इतकी घाबरली की तिने घाईघाईत माऊथवॉश घेतलं आणि कानात ओतलं. माऊथवॉश कानात ओतल्यानंतर आधी कानातून झुरळ फडफडण्याचा येणारा आवाजही बंद झाला. त्यानंतर तिने कानात छोटा चिमटा घातला आणि त्याच्या मदतीने झुरळाला बाहेर काढू लागली. पण झुरळाचा काही भागच तुटून चिमट्यात आला. काही केल्या झुरळ काही पूर्ण कानातून बाहेर येत नव्हतं. इतके प्रयत्न करून थकल्यानंतर अखेर तिने रुग्णालयात धाव घेतली.
डॉक्टरांनी तिच्या कानातील झुरळ बाहेर काढलं. पण तिच्या कानात त्या झुरळाचे तुकडे झाले होते. त्यांनी तुकड्यातुकड्यांमध्येच झुरळाला कानातून बाहेर काढलं. 3.5 ते 4 सेमी लांबीचं झुरळ होता. झुरळ काढण्याची ही प्रक्रियाही वेदनादायी होती. त्यानंतर डॉक्टरांनी अँटीबॅक्टेरिअल ड्रॉप दिल्याचंही तिने सांगितलं. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने आपला अनुभव सांगितला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.