Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 18:44 IST2021-10-13T18:40:53+5:302021-10-13T18:44:04+5:30
Coal india : ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे.

Coal india : देशात कोळशाची कमतरता ही अफवाच, सितारमण यांनी फेटाळले वृत्त
नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून कोळसा संकट अधिक गडद होताना दिसत आहे. वीज संकट दिवसागणिक तीव्र होत आहे. भारतासह जागतिक पातळीवर हे संकट आहे. भविष्यात पारंपारिक ऊर्जास्रोत कमी होत जाणार आहेत. त्यामुळे सरकारने अपारंपारिक ऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, देशात कोळशाच्या कमतरतेमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची भीती असताना केंद्र सरकारने कोळशाची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही कोळसा संकट ही अफवा असल्याचं म्हटलंय.
देशात "कोळशाचा पुरवठा सुरू आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाचा पुरेसा साठा असेल," अशी माहिती केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली होती. आता, निर्मला सितारमण यांनीही हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले. देशात कोळशाची कमतरता नाही, भारत एक पॉवर सरप्लस देश आहे, असे सितारमण यांनी अमेरिकेच्या हॉवर्ड कॅनेडी स्कूलमध्ये बोलताना याबाबत माहिती दिली. हॉवर्ड येथील प्राध्यापक लॉरेंस समर्स यांनी भारतातील कोळशाच्या कमतरतेबाबत प्रश्न विचारल होता. त्यावेळी, उत्तर देताना निर्मला सितारमण यांनी ही माहिती दिली.
ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात माहिती दिल्याचं सांगितलं. तसेच, कोळशाची कमतरता किंवा वीजेचं संकट हे वृत्त निराधार आहे. देशातील प्रत्येक वीज उत्पादक कंपनीकडे पुढील 4 दिवसांचा स्टॉक शिल्लक आहे. तर, कोळसा पुरवठ्याची साखळीही अखंडीत सुरू आहे. देशातील वीजनिर्मित्ती सक्षम आणि परिपूर्ण असून भारत सरप्लस देश आहे, असेही सितारमण यांनी म्हटलं.
काय म्हणाले ऊर्जामंत्री
"कोल इंडियाने सोमवारी १९.४ लाख टन कोळसा पुरवठा केला आहे. घरगुती कोळशाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरवठा आहे. तेथे १५-२० दिवसांचा कोळसा साठा होता, तो खाली आला आहे. पण आता कोळशाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही," असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. "अतिवृष्टीमुळे कोळसा उत्पादनाच्या कामावर परिणाम झाला. याशिवाय आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने देशांतर्गत कोळशावर दबाव वाढला. ज्या वीज प्रकल्पांनी त्यांचे उत्पादन थांबवले किंवा कमी केले ते आयात होणाऱ्या कोळशावर अवलंबून होते," असंही जोशी यांनी सांगितलं.
नियमानुसार २० दिवसांच साठा असावा
केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या (CEA) अहवालानुसार, २७ वीज प्रकल्पांमध्ये एक दिवसाचा कोळसा साठा आहे, २० वीज प्रकल्पांमध्ये दोन दिवसांचा आणि २१ वीज प्रकल्पांमध्ये तीन दिवसांचा कोळशाचा साठा आहे. तसंच २० वीज प्रकल्पांमध्ये ४ दिवसांचा साठा आहे, पाच प्रकल्पांमध्ये पाच दिवसांचा आणि आठ वीज प्रकल्पांमध्ये सहा दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही वीज प्रकल्पांमध्ये सात दिवसांचा साठा नाही, असं यात नमूद करण्यात आलं आहे. नियमानुसार, किमान २० दिवसांचा साठा असणं आवश्यक आहे.