केरळमधील दोघांना ख्रिस्ती समुदायाचे संतपद
By Admin | Updated: November 23, 2014 18:02 IST2014-11-23T17:28:17+5:302014-11-23T18:02:15+5:30
केरळमधील फादर कुरियाकोस आणि सिस्टर युफ्रासिया यांना मरणोत्तर संतपदाची उपाधी देण्यात आली आहे. रविवारी व्हॅटिकन सिटीमधील कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांनी या दोघांनाही संतपद बहाल केले.

केरळमधील दोघांना ख्रिस्ती समुदायाचे संतपद
ऑनलाइन लोकमत
व्हॅटिकन सिटी, दि. २३ - केरळमधील फादर कुरियाकोस आणि सिस्टर युफ्रासिया यांना मरणोत्तर संतपदाची उपाधी देण्यात आली आहे. रविवारी व्हॅटिकन सिटीमधील कार्यक्रमात पोप फ्रान्सिस यांनी या दोघांनाही संतपद बहाल केले असून केरळमधील सिरीयो मलबार चर्चला मिळालेले हे तिसरे संतपद आहे.
रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पीटर्स स्क्वेअर येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रार्थनासभेत पोप फ्रान्सिस यांनी केरळमधील दोघांना संतपद बहाल केले. फादर कुरियाकोस उर्फ चव्हारा (१८०५ ते १८७१) हे धर्मनिरपेक्ष शिक्षणाचे पुरस्कर्ते होते व त्यांनी केवळ कॅथलिकच नव्हे तर हिंदू दलितांसाठीही काम केल्याचे जाणकार सांगतात. १९८४ मध्ये त्यांना संतपद देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. तर सिस्टर युफ्रासिया यांचा जन्म १८७७ मध्ये त्रिसूर जिल्ह्यात झाला होता. सिस्टर युफ्रासिया यांच्याकडे येणा-या प्रत्येकाला त्या योग्य सल्ला देत व त्यांचे समाधान करत. १९५२ मध्ये सिस्टर युफ्रासिया यांचा मृत्यू झाला. १९८७ मध्ये त्यांना देवाच्या सेवक म्हणून घोषित करण्यात आले होते. रविवारी या दोघांना संतपद बहाल करण्यात आल्यावर केरळमध्ये उत्साहाचे वातावरण असून केरळमधील विविध ठिकाणी प्रार्थना सभांचे आयोजन केले जात आहे.