चिन्मय दास यांच्या जामिनावर ३ डिसेंबरला सुनावणी; देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 22:57 IST2024-12-01T22:57:00+5:302024-12-01T22:57:34+5:30
Chinmay Krishna Das Bail Plea, Bangladesh Court: चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत

चिन्मय दास यांच्या जामिनावर ३ डिसेंबरला सुनावणी; देशद्रोहाच्या आरोपाखाली बांगलादेशात अटक
Chinmay Krishna Das Bail Plea, Bangladesh Court: 'इस्कॉन'चे चिन्मय कृष्ण दास यांना गेल्या आठवड्यात बांगलादेशात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याविरोधात बांगलादेशसह भारतातही निदर्शने होत आहेत. यादरम्यान, चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीसाठी न्यायालयाने ३ डिसेंबरची तारीख निश्चित केल्याचे वृत्त आहे. चितगाँव महानगर पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त मोफिझ उर रहमान यांनी जामीन सुनावणीबाबत माहिती दिली. मोफिज यांच्या म्हणण्यानुसार, कोर्ट चिन्मय दास यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी करणार आहे. मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफ-उल-इस्लाम यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी चितगाँव न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयाने जामीन नाकारला आणि त्यांची तुरुंगात रवानगी केली. यानंतर त्यांच्या समर्थकांनी या अटकेचा तीव्र निषेध करत, निदर्शने सुरु केली. यामुळे सरकारवर दबाव आला असून, चितगाँव न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुनावणीची तारीख आधीच निश्चित करण्यात आली होती. मात्र बुधवार आणि गुरुवारी वकिलांच्या संपामुळे ही घोषणा लांबली. BDNews24 च्या रिपोर्टनुसार, ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
३० ऑक्टोबरला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला...
चिन्मय दास यांच्यासह १९ जणांविरुद्ध ३० ऑक्टोबरला चितगाँवमधील कोतवाली पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चितगाँवच्या न्यू मार्केट भागात हिंदू समुदायाच्या रॅलीदरम्यान बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी गुरुवारी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) शी संबंधित १७ लोकांची बँक खातीही गोठवण्यात आली.