चिनी विद्वानही म्हणतात, भगवद्गीता जगासाठी 'ज्ञानाचे अमृत', ती प्रत्येक समस्येचे उत्तर देते
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:27 IST2025-10-27T08:09:51+5:302025-10-27T08:27:27+5:30
यातील विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात

चिनी विद्वानही म्हणतात, भगवद्गीता जगासाठी 'ज्ञानाचे अमृत', ती प्रत्येक समस्येचे उत्तर देते
बीजिंग : भगवद्गीता ही ‘ज्ञानाचे अमृत’ व ‘भारतीय संस्कृतीचा लघु इतिहास’ आहे. जी आधुनिक काळात लोकांना भेडसावणाऱ्या आध्यात्मिक, भौतिक समस्यांची उत्तरे देते, असे मत चीनमधील विद्वानांनी व्यक्त केले आहे. भारतीय दूतावासाच्या वतीने बीजिंग येथे आयोजित ‘संगमम् - अ कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रेडिशन्स’ परिसंवादात चीनमधील अनेक तज्ज्ञांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर मते मांडली. ‘तत्त्वचिंतनाचा विश्वकोश’ असे गीतेचे वर्णन करत, यातील कालातीत विचार आजही भौतिक व आध्यात्मिक जीवनातील समतोल साधण्याचे मार्गदर्शन करतात, असे सांगितले.
गीतेमधून मानवी अस्वस्थता, संभ्रमाला उत्तर
झेजियांग विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर ओरिएंटल फिलॉसॉफी रिसर्च’चे संचालक प्रा. वांग झी-चेंग यांनी गीतेला ‘ज्ञानाचे अमृत’ म्हटले, “पाच हजार वर्षांपूर्वी रणांगणावर झालेला हा संवाद आजही मानवी अस्वस्थता आणि संभ्रमांना उत्तर देतो,” असे ते म्हणाले.
भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात श्रीकृष्णाचा प्रभाव
या परिसंवादातील प्रमुख वक्ते होते ८८ वर्षीय प्रा. झांग बाओशेंग. त्यांनी भगवद्गीतेचे चिनी भाषांतर केले आहे. ते म्हणाले,“भगवद्गीता भारताच्या आत्मिक दृष्टिकोनाचे दर्शन घडवते. कर्तव्य, कृती आणि वैराग्य या संकल्पना आजही भारतीय जीवनाचे केंद्र आहेत. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात मला श्रीकृष्णाचा सजीव प्रभाव जाणवला.”
भारतीय संस्कृतीचा अधिक सखोल अभ्यास करावा
शेंझेन विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंडियन स्टडीज’चे संचालक प्रा. यू लाँग्यु यांनी म्हटले की, “भारत हा महान संस्कृतीचा देश असून त्याचा तात्त्विक वारसा फार सखोल आहे.
चीनमधील विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अधिक सखोल अभ्यास करावा, त्यातून दोन्ही देशांतील समन्वय आणि जागतिक शांततेस हातभार लागेल.” परिसंवादात स्वागत करताना भारतीय राजदूत प्रदीपकुमार रावत म्हणाले की, “ही परिषद रामायण परिसंवादाचा पुढचा टप्पा आहे.”